दक्षिण मुंबईतील कफ परेड परिसरातील मच्छिमार नगर परिसरात आज (२० ऑक्टोबर) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास एका चाळीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत एका १५ वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्याच सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

कफ परेड परिसरातील कॅप्ट प्रकाश पेठे मार्गावरील एका चाळीत आज सकाळी आग लागली. या आगीची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेचं अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. ४.३५ वाजेपर्यंत अग्निशमन दलाने ही आग विझवली. चाळीतील एका १+१ घराच्या वरच्या मजल्यावर आग लागली होती. काही मिनिटात आग चाळीतील आणखी काही घरांमध्ये पसरली, मात्र, अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अवघ्या काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र, या दुर्घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला आहे. तर, तीन जण होरपळले आहेत.

आगीचं कारण काय?

ही आग फटाक्यांमुळे लागली असावी असा संशय सुरुवातीला व्यक्त करण्यात आला होता. मात्र, प्राथमिक तपासानंतर सांगण्यात आलं की शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी. पोलीस व अग्निशमन दल या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासाअंती आगीचं खरं कारण समोर येईल. मात्र, या आगीच्या घटनेमुळे सदर चाळीतील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तसेच कफ परेडसह आसपासच्या परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे.