मुंबई : दादर प्लाझा येथील जे. के मार्गावरील इंद्रायणी संकुलामध्ये गेल्या दीड महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही समस्या जैसे थे असल्याने रहिवासी हतबल झाले आहेत. अनेकांना आरोग्याच्या समस्या सतावू लागल्या आहेत. त्यामुळे खिशाला कात्री लावून नागरिकांना आता पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.

महानगरपालिका प्रशासनातर्फे मुंबईला दररोज ४ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा करताना जागतिक आरोग्य संघटना आणि आयएसने प्रमाणित केलेल्या मानकांनुसार जलशुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. एकंदरीत मुंबईकरांना निर्जंतुक, स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवल्याचा दावा पालिकेकडून केला जातो. मात्र, दादरमधील काही भागांत गेल्या अनेक महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या इंद्रायणी संकुलात गेल्या दीड महिन्यांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्याबाबत महापालिकेकडे चार ते पाच वेळा तक्रार केली असून अद्यापही पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही.

इंद्रायणी संकुलामध्ये चार इमारती असून सुमारे १२३ सदनिका आहेत. दूषित पाणीपुरवठ्यामुळे अनेकांना ताप आणि खोकल्याचा त्रास होत असल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले. इमारतीला दररोज तीन तास पाणी पुरवले जाते. मात्र, सुरुवातीचा अर्धा तास अत्यंत अशुद्ध पाणी येत असल्याने ते सोडावे लागते. त्यामुळे इमारतीतील रहिवाशांनी पिण्याच्या पाण्यासाठी पदरमोड करावी लागत आहे. याबाबत माहापालिकेकडे तक्रार केल्यांनतर पालिका कर्मचाऱ्यांनी सोसायटीला भेट देऊन पाहणी केली. मात्र, अद्याप त्याचे ठोस कारण स्पष्ट झाले नसून पालिकेकडून जलजोडण्यांची तपासणी सुरू आहे. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने तातडीने तांत्रिक तपासणी करून कायमस्वरूपी उपायोजना करावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही पाण्याचा दर्जा सुधारत नसल्याचे लक्षात घेऊन आमदार महेश सावंत यांनीही प्रत्यक्ष पाहणी केली होती. तसेच, त्यांनी पालिका अधिकाऱ्यांनी पाण्याच्या समस्येचे निराकरण करण्याचे आदेश दिले. मात्र, त्यानंतरही सुधारणा झालेली नाही, असा आरोप रहिवाशांनी केला.

दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे रहिवाशांनी संकुलामधील पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या. मात्र, त्यानंतरही दूषित पाणीपुरवठा सुरूच आहे. कुटुंबातील सर्वांनाच ताप, खोकला सुरू झाला असून प्रचंड गैरसोय होत आहे. – मंदार खर्गे, रहिवासी