Sir J J Hospital Doctor Omkar Kavitake Suicide: मुंबई येथील सर जे. जे. रुग्णालयात काम करणारे ३२ वर्षीय डॉक्टर ओमकार कविताके यांनी शिवडी-न्हावा सागरी सेतूवरून ७ जुलै रोजी उडी मारून आत्महत्या केली होती. नवी मुंबईतील कळंबोलीत राहणारे डॉ. ओमकार हे गेल्या सहा वर्षांपासून सर जे.जे. रुग्णालयात काम करत होते. ७ जुलै रोजी रात्री एका वाहनचालकाने पुलावरील रेलिंग ओलांडताना पाहून एका व्यक्तीने नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली होती. अटलसेतूवरील बचावदलाचे पथक घटनास्थळी पोहोचले, पण डॉ. ओमकार यांनी तिथून उडी घेतली होती.
डॉ. कविताके यांच्या आत्महत्येनंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, प्राथमिक तपास करत असताना आम्ही कुटुंबातील काही सदस्यांशी, त्यांच्या सहकाऱ्यांशी आणि मित्रांशी संवाद साधला. डॉ. कविताके यांचे मुंबईतीलच एका डॉक्टरशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
पण महिन्याभरापूर्वी महिला डॉक्टरच्या कुटुंबाने त्यांच्या प्रेमसंबंधाला विरोध दर्शविला आणि लग्नास नकार दिला. या घटनेनंतर डॉ. कविताके हे नैराश्यात गेले होते. या कारणामुळे त्यांनी आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
डॉ. कविताके यांचे कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांना त्यांच्या या निर्णयाचा धक्का बसला आहे. डॉ. कविताके यांच्याकडे जनरल सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि प्रोक्टोलॉजीमध्ये आठ वर्षांचा अनुभव होता. ते व्यावसायिकदृष्ट्या उत्तम काम करत होते आणि लवकरच ते व्याख्याता होणार होते.
आणखी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या ठिकाणी डॉ. कविताके यांनी उडी मारली, त्या भागात पाण्याचा प्रवाह जोरात होता आणि खोलीही अधिक होती. त्यामुळे ते पाण्याबरोबर वाहत गेल्याची भीती आहे.
घरी जेवायला येतो, आईला केला होता शेवटचा फोन
कळंबोली येथे राहणाऱ्या डॉ. कविताके यांनी घरी निघण्याआधी आईला फोन केला होता. रात्री जेवणासाठी येतोय, असे त्यांनी आईला सांगितले. त्यांनी घरी जाण्यासाठी त्यांची गाडी अटल सेतूवरून घेतली. मात्र मध्येच गाडी थांबवून त्यांनी ९.२६ वाजण्याच्या सुमारास अटल सेतूवरून उडी मारल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.