मुंबई : मालाडच्या कुरार परिसरात रविवारी पहाटे एका व्यक्तीवर गोळ्या झाडण्यात आल्या. मालमत्तेच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी फरार असून गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे.
कुरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. मालाडच्या कुरार गावात वास्तव्यास असलेल्या अबीतुल्लाह उर्फ तुला बेगला (३८) भेटण्यासाठी त्याचा मित्र गुड्डू बिहारी आला होता. ते दोघे शनिवार रात्रीपासून संजय नगरमधील एका खोलीत मद्यपान करीत बसले होते. यावेळी गुड्डू बिहारीचा मित्र त्यांच्या सोबत होता. ते पहाटेपर्यंत मद्यपान करीत होते. पहाटे ४.३० च्या सुमारास गप्पा सुरू असताना मालमत्तेवरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. काही वेळात बिहारी आणि बेग यांच्यात भांडण सुरू झाले. काही वेळानंतर मद्याच्या नशेत असलेल्या बिहारीने खिशातून देशी रिव्हॉल्व्हर काढले आणि बेगवर तीन गोळ्या झाडल्या. जवळून गोळ्या झाडल्याने बेग जमिनीवर कोसळला.
बेगच्या मानेवर कानाजवळ एक गोळी लागली. त्याला उपचारासाठी डीएनए रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर पुढील उपचारासाठी त्याला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फरार झालेला आरोपी गुड्डू बिहारीचा शोध घेत आहोत. मालमत्तेच्या वादातून हा गोळीबार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहोत, असे कुरार पोलिसांनी सांगितले.
आरोपी फरार, शोध सुरू
गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारी तेथे आले आणि त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा बिहारी आणि त्याचा साथीदार पळून गेले होते, तर बेग रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. कुरार पोलिसांनी आरोपी बिहारीविरोधात गोळीबार आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.