मुंबई : अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपुलाची दुसरी लोखंडी तुळई खाली आणण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून येत्या आठवड्यात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. तुळई खाली आणल्यानंतर क्रॅश बॅरिअर, डांबरीकरण, पोहोच रस्त्यांची कामे, पथदिवे, मार्गिकांचे रंगकाम अशी विविध कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. पुलाची दुसरी बाजू सुरू करण्यासाठी एप्रिल २०२५ चे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे.
गोखले पुलाची एक बाजू २६ फेब्रुवारी रोजी सुरू झाल्यानंतर आता दुसरी बाजू कधी सुरू होणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. मात्र या पुलाच्या कामाला वारंवार उशीर होत आहे. पुलाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर १५ महिन्यांनी एक बाजू सुरू होऊ शकली. यावर्षी एप्रिलच्या सुरुवातीला पुलाच्या दुसऱ्या बाजूच्या तुळईचे भाग दिल्लीहून मुंबईत आणण्यास सुरुवात झाली होती. दुसऱ्या तुळईचे सुटे भाग येण्यास उशीर झाला. त्यामुळे पालिकेचे नियोजनही कोलमडले होते. दुसरी बाजू सुरू करण्याची मुदतही पुढे ढकलावी लागली होती. त्यानंतर तुळईचे सर्व भाग जोडून ५ सप्टेंबरला ही तुळई रेल्वे मार्गावर बसवण्यात आली. मात्र नोव्हेंबर महिना उजाडला तरी तुळई ८ मीटरपर्यंत खाली आणण्याचे काम सुरू झाले नव्हते. मात्र रेल्वेने परवानगी दिल्यानंतर नुकतेच हे काम सुरू झाले असून तुळई पाच मीटरपर्यंत खाली आणण्यात यंत्रणेला यश आले आहे.
हेही वाचा : पिस्तुलासह ६७ जिवंत काडतुसे जप्त; तीन आरोपींना अटक
रेल्वेच्या हद्दीतील कामे करण्यासाठी कंत्राटदाराला नोव्हेंबर महिन्याची मुदत देण्यात आली होती. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीसपर्यंत तुळई खाली उतरवण्याचे काम अंतिम टप्प्यात येणार असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली. तुळईच्या आधारासाठी रेल्वेच्या हद्दीत काही लोखंडी सांगाडे उभे केले होते. ते सांगाडे हटवण्यासाठी रेल्वेची परवानगी मिळण्यास उशीर झाल्यामुळे तुळई खाली घेण्याचे काम रखडले होते. हे सांगाडे हटवून गेल्या आठवड्यापासून तुळई खाली आणण्यास सुरूवात झाली आहे.
हेही वाचा : मुंबई : आज पश्चिम रेल्वेवर, उद्या मध्य रेल्वेवर ब्लॉक
पुढील वर्षाची मुदत
दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे भागातील पुलाची कामे १४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले होते. तर महानगरपालिकेच्या हद्दीतील पोहोच रस्त्याचे काम ३० एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पुलाची दुसरी बाजू सुरू होण्यास पुढचे वर्ष उजाडणार आहे.
© The Indian Express (P) Ltd