मुंबई : प्रभावशाली व्यक्तींविरोधात वार्तांकन करणाऱ्या पत्रकांराना छळवणुकीला सामोरे जावे लागते. अलीकडे अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने बुधवारी केली. तसेच, एका युट्यूबर-पत्रकार महिलेने छळवणुकीच्या आणि तिला धमकावले जात असल्याबाबत केलेल्या आरोपांवर राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

अलीकडच्या काळात पत्रकारांच्या छळवणुकीच्या बऱ्याच घटना समोर आल्या आहेत. एखाद्या प्रभावशाली व्यक्तिंबाबत वार्तांकन केल्यानंतरच पत्रकरांवर हल्ले अथवा त्यांची छळवणूक केली जाते, असेही न्यायालयाने उपरोक्त आदेश देताना नमूद केले.

याचिकाकर्ती एक युट्यूबर-पत्रकार आहे. तिच्या याचिकेनुसार, जुलै महिन्यात तिच्यावर हल्ला करण्यात आला. त्यावेळी ती पुण्यातील बेकायदेशीर बांधकामांविरोधात वार्तांकन करत होती. त्यावेळी तिच्यावर लोखंडी सळईने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी तिने तक्रारही नोंदवली. परंतु, त्यानंतर तिला धमक्यांचे फोन येणे सुरू झाले, असे याचिकाकर्तीच्या वतीने वरिष्ठ वकील मिहीर देसाई यांनी न्यायालयाला सांगितले. त्यासंदर्भात तिने पोलीस अधीक्षकांना तीन वेळा पत्रव्यवहार केला. तथापि, त्यावर अद्यापही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याकडेही देसाई यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

दरम्यान, याप्रकरणी सादर केलेले पुरावे अपुरे आहेत. तुम्हाला सक्षम, सबळ पुरावे सादर करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करून न्यायालयाने याचिकेबाबत असमाधान व्यक्त केले. तसेच आवश्यक तपशील आणि चुकीच्या स्वरुपात याचिका केल्याचेही नमूद केले.