मुंबई : विभक्त पतीवर मुलांसह वृद्ध पालकांना सांभाळणे आणि स्वतःच्या उपजीविकेच्या साधनाचे व्यवस्थापन करणे अशा विविध जबाबदाऱ्या असल्याची बाब उच्च न्यायालयाने त्याला दिलासा देताना प्रामुख्याने लक्षात घेतली. तसेच, विभक्त पत्नीच्या तुलनेत याचिकाकर्त्याची बाजू अधिक अडचणीची असल्याचे निरीक्षण नोंदवून कौटुंबिक वादाशी संबंधित प्रकरण ठाणे न्यायालयातून धुळे येथील न्यायालयात वर्ग करण्याची याचिकाकर्त्याची मागणी मान्य केली.

हे एक विलक्षण प्रकरण आहे. यात दोन्ही पक्षकारांना खरोखरच अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे, याचिकाकर्त्य़ाला त्याचे किराण्याचे दुकान चालवायचे असून तेथे त्याची वैयक्तिक उपस्थिती अनिवार्य आहे. त्याच्यावर शाळेत जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांची आणि वृद्ध पालकांची काळजी घेण्याची देखील जबाबदारी आहे. दुसरीकडे, विभक्त पत्नी कमी शिकलेली असल्याने आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्याने तिला स्वतःचा उदयनिर्वाह करणे कठीण आहे. सध्या ती तिच्या वृद्ध आणि आजारी पालकांवर पूर्णपणे अवलंबून आहे.

प्रकरणातील विभक्त पती-पत्नीचा विचार करता याचिकाकर्त्याची बाजू अधिक उजवी आणि अडचणीची वाटते. त्याच्यावरील जबाबदाऱ्या पत्नीच्या तुलनेत जास्त आणि महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे, याचिकाकर्त्याच्या परिस्थितीचा विचार करता त्याला न्यायालयीन प्रकरणासाठी धुळे येथून ठाणे येथे येणे त्रासादायक ठरणार आहे, असे मत न्यायमूर्ती कमल खाता यांच्या एकलपीठाने व्यक्त केले.

याशिवाय, विभक्त पत्नीची धुळे येथे येण्याची समस्या सो़डवण्यासाठी त्याने ती आणि तिच्यासह येणाऱ्या व्यक्तीचा खर्च उचलण्याची तयारी देखील दाखवली आहे. ही बाब लक्षात घेता कौटुंबिक प्रकरण ठाणे न्यायालयातून धुळे न्यायालयात वर्ग करणे अधिक सोयीस्कर ठरणार असल्याचे निरीक्षण एकलपीठाने याचिकाकर्त्याला दिलासा देताना व्यक्त नोंदवले.

म्हणून याचिकाकर्त्या पतीला दिलासा

याचिकाकर्त्यावरील जबाबदाऱ्या एवढ्या आहेत की त्याला प्रकरणाच्या सुनावणीसाठी धुळे येथून ठाण्यात यायला सांगणे योग्य ठरणार नाही. किंबहुना, त्याच्यासाठी ते अडचणीचे ठरू शकते. याउलट, प्रतिवादी पत्नीने याचिकाकर्त्याची ही स्थिती नाकारलेली नाही. तसेच, ती अर्धशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत असली तरी, ठाणे ते धुळे प्रवास करु शकत नाही हे तिने सिद्ध केलेले नाही. याशिवाय, एकटीने प्रवास करणे आणि प्रवासाचा खर्च हा तिच्यासमोरील एकमेव प्रश्न आहे. परंतु, तिची ही समस्या याचिकाकर्ता सोडवण्यास तयार आहे. त्यामुळे, कौटुंबिक वादाशी संबंधित प्रकरण ठाणे न्यायालयातून धुळेस्थित न्यायालयत वर्ग करणे अधिक योग्य असल्याचे निरीक्षण न्यायालयाने आदेशात नोंदवले.