मुंबई: जगभरात मानसिक आजार झपाट्याने वाढत असून त्याचा थेट परिणाम सामाजिक, आर्थिक आणि आरोग्य व्यवस्थेवर होत आहे. लॅन्सेटने नुकताच प्रसिद्ध केलेल्या अहवालात मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. औषधोपचार आणि समुपदेशनाबरोबरच नियमित व्यायाम, संतुलित आहार, झोपेची काळजी, तसेच धूम्रपान व मद्यपानाचा त्याग केल्यास मानसिक आरोग्याचे परिणाम अधिक प्रभावी ठरतात, असे या अहवालात अधोरेखित केले आहे.
या अहवालानुसार, नैराश्य, चिंताग्रस्तता, ताणतणाव यांसारख्या मानसिक आजारांचे प्रमाण जगभर झपाट्याने वाढत आहे. भारतासह विकसनशील देशांत तर ही समस्या गंभीर होत असून, उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी बहुसंख्यांना शारीरिक आजारही आढळून येतात. विशेषत: स्थूलता, मधुमेह, हृदयरोग यांचा मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होत असल्याचे संशोधकांनी नमूद केले.
लॅन्सेटच्या अहवालात जागतिक पातळीवरील आरोग्यधोरणांमध्ये मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्याचा समन्वय साधण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे. भारतातही राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत या जीवनशैलीतील बदलांचा समावेश करण्याची गरज असल्याचे आरोग्यतज्ज्ञांनी मत व्यक्त केले.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगभरात सुमारे ९७ कोटी लोक मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. त्यात नैराश्य आणि चिंताग्रस्तता हे विकार सर्वाधिक प्रमाणात आढळतात. भारतातच सुमारे १४ टक्के प्रौढ लोकसंख्या मानसिक आजारांनी प्रभावित असल्याचा अंदाज आहे. शालेय वयातील मुलांमध्येही ताणतणाव आणि नैराश्याचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. मधुमेह, हृदयरोग, स्थूलता यांसारख्या आजारांमुळे मानसिक तणाव वाढतो, तर मानसिक तणावामुळे हे शारीरिक आजार गंभीर रूप धारण करतात. लॅन्सेट अहवालानुसार, मानसिक आजार असलेल्या रुग्णांमध्ये शारीरिक आजार होण्याची शक्यता ४० टक्के जास्त असते.
तज्ज्ञांचे मत
मानसिक आरोग्याच्या उपचारात केवळ औषधोपचार पुरेसे नाहीत. रुग्णांनी आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले, तर औषधोपचारांचा परिणाम अधिक चांगला दिसतो. उदाहरणार्थ, रोजच्या किमान ३० मिनिटांच्या चालण्याने किंवा व्यायामाने केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नव्हे तर मानसिक समाधान, ताण कमी होणे आणि आत्मविश्वास वाढणे यास मदत मिळते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मानसोपचार तज्ज्ञांच्या मते औषधोपचार हा मानसिक आजारांवरील एक भाग आहे. पण जर रुग्णांनी स्वतःच्या जीवनशैलीत बदल केले नाहीत तर औषधांचा दीर्घकालीन परिणाम कमी होतो. दररोजचा व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप हेच मानसिक आरोग्याचे मूळ आधार आहेत. केंद्र शासन राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम राबवत असला तरी त्यात जीवनशैली हस्तक्षेपावर अधिक भर देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
ग्रामीण व शहरी भागांत मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये समुपदेशन व जीवनशैली मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, तसेच शालेय पातळीवर मानसिक आरोग्य शिक्षण बंधनकारक करणे या उपाययोजना तातडीने राबवणे गरजेचे असल्याचे लॅन्सेटच्या निष्कर्षावरून अधोरेखित झाले आहे.