मुंबई : काही भागांतून मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. काही दिवसांतच महाराष्ट्रातूनही मोसमी वारे माघारी परतण्यास सुरुवात होईल. दरम्यान, मुंबईत गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस कोसळला. त्यानंतर मात्र पावसाने ओढ दिली. परिणामी मुंबईत उन्हाचा ताप आणि उकाड्यात वाढ होऊ लागली आहे. यादरम्यान काही भागात पावसाच्या तुरळक सरी वगळता हवामान कोरडे राहील, असा अंदाज आहे.
मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू असताना अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेषत: घाटमाथ्यावर, मुंबई आणि पुणे परिसरात. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह इतर भागात तापमानात वाढ होऊ लागली आहे. वातावरणातील उष्णता वाढू लागली आहे. यामुळे असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. मुंबईकरांना मंगळवारी उकाड्याची जाणीव असह्य झाली. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३१.६ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३१.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. गेल्या आठवड्यात पाऊस, तर आता उन्हाचा चटका वाढू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
उन्हाचा ताप कमीच
यंदा ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा ताप फारसा नसणार असा अंदाज खासगी हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. दिवसाचे तापमान साधारण ३२-३३ अंश सेल्सिअस दरम्यान राहील तर, किमान तापमान मात्र सरासरीइतके राहील त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळू शकतो, असे हवामान अभ्यासक ऋषिकेश आग्रे यांनी सांगितले.
पावसाची हुलकावणी
मोसमी पावसाच्या प्रवासाचे वेळापत्रक गेल्या काही वर्षांपासून बदलले आहे. मोसमी पाऊस राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू करत असतो. त्याची नियोजित तारीख पूर्वी १ सप्टेंबर होती. परतीचा कालावधीत सातत्याने वाढत असल्याने हवामान विभागाने काही वर्षांपूर्वी ही तारीख १७ सप्टेंबर केली आहे. मात्र, या तारखेलाही मोसमी पाऊस हुलकावणी देत असून, तो उशिरानेच परतत आहे.