रेल्वेच्या विविध कामांनिमित्त रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्ग आणि हार्बरवरील कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रीच बोरिवली ते भाईंदर दरम्यान ब्लॉक घेण्यात आल्यामुळे रविवारच्या ब्लॉकमधून पश्चिम मार्गावरील प्रवाशांची सुटका झाली आहे. असे असले तरी रविवारच्या वेळापत्रकानुसार उपनगरी रेल्वे धावणार आहेत.

मध्य रेल्वे-मुख्य मार्ग –

कुठे – माटुंगा-मुलुंड डाऊन जलद मार्ग

कधी – स. १०.३० ते दु. ३.००

परिणाम – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या जलद व अर्ध जलद उपनगरी रेल्वे माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर धावतील. मुलुंडनंतर पुन्हा जलद मार्गावरून उपनगरी रेल्वे धावणार आहेत. ठाणे स्थानकातून सुटणाऱ्या जलद उपनगरी रेल्वे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकांत थांबतील. मुख्य मार्गावरील उपनगरी रेल्वे पंधरा मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर मार्ग –

कुठे – कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गावर

कधी – स.११.४० ते दु ३.४० वा

परिणाम – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी, बेलापूर, पनवेलपर्यंत धावणाऱ्या दोन्ही मार्गावरील उपनगरी रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल दरम्यान विशेष उपनगरी रेल्वे फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.