मुंबई : दक्षिण मुंबईतील मलबार हिल येथील बहुचर्चित असा निसर्ग उन्नत मार्ग (एलिव्हेटेड नेचर ट्रेल) तयार झाला असून रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी या मार्गाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईत कमला नेहरू उद्यान आणि फिरोजशाहा मेहता उद्यान येथे वृक्षराजीच्या सान्निध्यात रपेट (ट्री वॉक) करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. मुंबईतील पहिल्याच अशा या उन्नत मार्गाच्या माध्यमातून स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) लगतच्या समुद्राचे दर्शनही घडणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईच्या एका टोकाला असलेला मलबार हिल परिसर घनदाट झाडांसाठी व निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. या परिसरातील हॅंगिंग गार्डन, म्हातारीचा बूट आकर्षण केंद्रे आहेत. या आकर्षण केंद्रात आता आणखी एक भर पडणार आहे. मुंबई महानगरपालिकेने या परिसरात ‘निसर्ग उन्नत मार्ग’ (एलिव्हेटेड नेचर ट्रेल) तयार केला आहे. सिंगापूर येथे विकसित ‘ट्री टॉप वॉक’ या संकल्पनेशी साधर्म्य असलेला हा उन्नत मार्ग मुंबईत पहिल्यांदाच विकसित करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाने हा प्रकल्प पूर्ण केला आहे. प्रकल्पाची सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर हा उन्नत मार्ग येत्या रविवारी पर्यटकांसाठी खुला होणार आहे.

या निसर्ग उन्नत मार्गाचे लोकार्पण कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री आणि मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते रविवारी ३० मार्च रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) यतीन दळवी, जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे, सहायक आयुक्त (डी विभाग) मनीष वळंजू आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

समुद्र न्याहाळता येणार

हा प्रकल्प महानगरपालिकेच्या डी विभागअंतर्गत फिरोजशहा मेहता उद्यान आणि कमला नेहरू उद्यान या ठिकाणी जल अभियंता विभागामार्फत विकसित करण्यात आला आहे. या निसर्ग उन्नत मार्गाची लांबी एकूण ४८५ मीटर आणि रूंदी २.४ मीटर इतकी आहे. या मार्गावर एका ठिकाणी समुद्राचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी ’सी व्हिविंग डेक’ देखील बांधण्यात आला आहे.

काय आहे या प्रकल्पात

या प्रकल्पाअंतर्गत लाकडी फलाटाच्या उन्नत मार्गावर (लाकडी साकव) चालण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. लाकडी कठडा (रेलिंग), दुतर्फा आधार देणारे खांब आणि लाकडी जोडणी सांधे अशा पद्धतीची रचना या मार्गावर करण्यात आली आहे. भक्कम पायाभरणीसह (पाईल फाऊंडेशन) पोलादी जोडणीचा आधारही या बांधकामाला देण्यात आला आहे. त्यासमवेत, आकर्षक अशा स्वरूपाची प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटकांच्या भेटीची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी प्रवेश नियंत्रण प्रणाली (एक्सेस कंट्रोल सिस्टिम ) विकसित करण्यात आली आहे. प्रकल्प कक्षातून संपूर्ण उन्नत मार्गावर देखरेख ठेवणे, तसेच भेट देणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. एवढेच नव्हे तर आपत्कालीन मार्गाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

पक्षीही न्याहाळता येणार

मुंबईच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवणाऱ्या १०० हून अधिक वनस्पतींसह निरनिराळे पक्षी न्याहाळण्याची संधी देखील या ठिकाणी मिळणार आहे. वनस्पतींमध्ये गुलमोहर, बदाम, जांभूळ, कांचन, ताड, फणस, रतन गुंज, सीता अशोक, अर्जुन, मुचकुंद, सप्तपर्णी, करमळ, विलायती शिरीष आदी प्रजातींचा समावेश आहे. पक्ष्यांमध्ये कोकीळ, ताडपाकोळी, घार, भारतीय राखी धनेश, खंड्या, तांबट, टोपीवाला पारवा / पोपट, हळद्या, नाचण/नाचरा/नर्तक, कावळा, शिंपी चिमणी, बुलबुल, लालबुड्या बुलबुल, साळुंकी, दयाळ, चिमुकला फुलटोचा, जांभळ्या पाठचा सूर्यपक्षी, शुभ्रकंठी, ठिपकेवाली मनोली आदी पक्षी पाहण्याची संधी मिळणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai malabar hill elevated nature trail to be opened on the occasion of gudi padwa mumbai print news css