मुंबई : मालाड पोलीस ठाण्यामागील उंद्राई मार्गावरील एका फटाक्यांच्या दुकानाला गुरुवारी सायंकाळी ७ च्या सुमारास भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही, मात्र दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य हाती घेतले. दुकानाला आग लागल्याचे समजताच आसपासच्या नागरिकांनीही घराबाहेर धाव घेतली.
दुर्घटनाग्रस्त दुकान अरुंद चाळीत असल्यामुळे तसेच, आगीमुळे निर्माण झालेल्या धुराने अग्निशामकांना आग विझवण्यात अडचणी आल्या. सुमारे ३० × ३० चौरस फूट जागेत आग लागली होती. आगीची वाढती तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने सायंकाळी ७.२७ च्या सुमारास क्रमांक एकची वर्दी दिली. अथक प्रयत्नांनंतर रात्री १०.३० च्या सुमारास आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.