मुंबई : ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ला रविवारी ११ वर्षे पूर्ण होत आहेत. या ११ वर्षांच्या कालावधीत तब्बल १११ कोटी प्रवाशांनी ‘मेट्रो १’मधून प्रवास केला. या ११ वर्षांत घाटकोपर – वर्सोवादरम्यान १२.६ लाख मेट्रो फेऱ्या धावल्या. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील पहिल्या मेट्रोची अर्थात ‘मेट्रो १’ची उभारणी सार्वजनिक – खासगी सहभागातून करण्यात आली आहे.

रिलायन्स इन्फ्रा अर्थात मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) ११.५ किमी लांबीच्या मेट्रो मार्गाचे बांधकाम केले. या मेट्रोच्या संचलनाची संपूर्ण जबाबदारी एमएमओपीएलकडे आहे. मुंबईतील ही पहिली मेट्रो मार्गिका ८ जून २०१४ रोजी वाहतूक सेवेत दाखल झाली असून मेट्रो १ ला रविवारी ११ वर्षे पूर्ण होत आहेत. या ११ वर्षांच्या कालावधीत मेट्रो १ वरून १११ कोटी प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती एमएमओपीएलकडून देण्यात आली आहे. या ११ वर्षांत मेट्रोच्या १२.३ लाख फेऱ्या झाल्या असून मेट्रो गाड्यांनी आतापर्यंत १.४५ कोटी किमी प्रवास केला आहे. वक्तशीरपणातही मेट्रो १ अव्वल ठरली आहे.

दरम्यान, मेट्रो १ सेवेत दाखल झाल्यानंतर या मार्गिकेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र मागील काही वर्षांत मेट्रो १ च्या प्रतिसादात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळेच आजघडीला मेट्रो १ मधून दिवसाला अंदाजे ५ लाख प्रवासी प्रवास करतात. दैनंदिन प्रवासी संख्येने ५.४७ लाखांची विक्रमी संख्या पार केली होती.

मेट्रो १ च्या ११ वर्षांच्या सेवाकाळात १११ कोटी प्रवाशांनी प्रवास केला असून यातील सर्वाधिक ३० कोटी प्रवाशांनी घाटकोपर मेट्रो स्थानकावरून प्रवास केला आहे. तर जागृती नगर मेट्रो स्थानकावरून सर्वात कमी प्रवाशांनी प्रवास केल्याचे निदर्शनास आले आहे. या स्थानकातून ११ वर्षात केवळ १.८ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. घाटकोपरपाठोपाठ सर्वाधिक प्रवासी संख्या अंधेरी मेट्रो स्थानकातील आहे. या स्थानकावरून आतापर्यंत २३.१ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. वर्सोवा स्थानकावरून ४.१ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. दरम्यान प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुकर व्हावा यासाठी एमएमओपीएलकडून नियमितपणे आवश्यक त्या उपायोयजना केल्या जात आहेत. त्यामुळे मेट्रो १ ला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे एमएमओपीएलकडून सांगण्यात येत आहे.