मुंबई : मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) ‘कफ परेड – वांद्रे – सीप्झ – आरे भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेवरील प्रवाशांच्या सोयीसाठी मासिक ट्रीप पास १० दिवसांत उपलब्ध करण्याची घोषणा २८ ऑक्टोबर रोजी केली. मात्र एमएमआरसीने अद्याप मासिक ट्रीप पास सुविधा उपलब्ध केलेली नाही. लवकरात लवकर मासिक ट्रीप पास उपलब्ध करावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
मुंबईतील पहिली ३३.५ किमी लांबीची भुयारी मेट्रो मार्गिका ९ ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने धावू लागली. या मार्गिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आचार्य अत्रे चौक – कफ परेड दरम्यानचा शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाली आणि ‘मेट्रो ३’ पूर्ण क्षमतेने धावू लागली. त्यानंतर या मार्गिकेला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होईपर्यंत या मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्या ७० हजार होती. आता दैनंदिन प्रवासी संख्या दीड लाखाच्या वर गेली आहे. येत्या काळात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना विविध सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय एमएमआरसीने घेतला आहे. यापैकीच एक म्हणजे मासिक ट्रीप पास. मासिक ट्रीप पास उपलब्ध करण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. त्यानुसार एमएमआरसीने दहा दिवसांत मासिक ट्रीप पास सुविधा उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती २८ ऑक्टोबर रोजी ‘एक्स’ माध्यमावरून दिली.
मासिक ट्रीप पासच्या अनुषंगाने तिकिट प्रणालीत आवश्यक ते बदल करण्याचे काम सुरू आहे. मासिक ट्रीप पासमध्ये दिव्यांगांना २५ टक्के सवलत देण्याचेही एमएमआरसीने नमुद केले होते. या घोषणेला २० दिवस उलटून गेले तरी अद्याप मासिक ट्रीप पास सुविधा सुरू झालेली नाही. प्रवासी या सुविधेची वाट पाहत आहेत. ही सुविधा केव्हा सुरू होणार याविषयी एमएमआरसीकडे विचारणा केली असता कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही.
मोबाइल नेटवर्कही नाही
भुयारी मेट्रो पूर्ण क्षमतेने सेवेत दाखल होऊन एक महिना उलटला तरी ‘मेट्रो ३’मधून प्रवास करताना प्रवाशांना मोबाइलचा वापर करता येत नाही. आरे – आचार्य अत्रे चौकदरम्यान केवळ वोडाफोनचेच नेटवर्क कार्यरत आहे, तर आचार्य अत्रे चौक – कफ परेडदरम्यान कोणत्याही मोबाइल कंपनीच्या नेवटर्कची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे मोबाइल नेटवर्कचीही सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, एमएमआरसी आणि मोबाइल कंपन्यांमध्ये काही मुद्द्यावरून वाद सुरू असून हा वाद मिटत नसल्याने मोबाइल नेटवर्कचाही प्रश्न सुटू शकलेला नाही.
