मुंबई : पावसाळा तोंडावर आलेला असताना मुंबईतील अनेक भागांमधील नालेसफाई अद्याप झालेली नाही. नालेसफाईतील दिरंगाईबाबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही संताप व्यक्त केला असून चांदिवली येथील कचऱ्याने भरलेल्या नाल्यात उतरून मंगळवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. दरम्यान, नाल्यात व्हॉलीबॉल खेळून कार्यकर्त्यांनी या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

महानगरपालिकेतर्फे दरवर्षी पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून नालेसफाई केली जाते. संपूर्ण वर्षभरातील नालेसफाईपैकी ८० टक्के गाळ पावसाळ्यापूर्वी, तर १० टक्के गाळ पावसाळ्यादरम्यान काढला जातो. तसेच पावसाळ्यानंतर १० टक्के गाळ काढला जातो. मात्र, दरवर्षी पालिकेच्या नालेसफाईवरून वादंग निर्माण होत आहे. अनेक भागांमध्ये नालेसफाई योग्यरीत्या होत नसल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. यंदाही नालेसफाईवरून पालिकेवर टीका केली जात आहे. विविध भागांमध्ये अद्यापही नालेसफाई झाली नसल्याने नाले कचऱ्याने तुडुंब भरलेले आहेत. नुकतेच अवकाळी पावसात मुंबई उपनगरातील मानखुर्द – गोवंडी, कुर्ला, बोरिवली, दहिसर, भांडुप, घाटकोपर आदी भागांमध्ये पाणी साचले होते.

अवकाळी पावसाच्या सरींनी पाणी तुंबल्यामुळे मुंबईकरांकडून संताप व्यक्त केला गेला. तसेच, अनेक भागांमध्ये नालेसफाई होत नसल्याच्या तक्रारी समाजमध्यामांवरून केल्या जात आहे. चांदिवली भागातही नालेसफाईत दिरंगाई होत असल्याचा आरोप मनसेचे चांदिवली विधानसभेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी केला आहे. दर्जेदार नालेसफाईचा अभाव आणि कामातील दिरंगाईमुळे चांदिवलीत नाल्यात उतरून कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तसेच, पालिकेविरोधात घोषणाबाजी करीत निषेध करण्यात आला. या समस्येकडे नागरिक व पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कचऱ्याने भरलेल्या नाल्यात व्हॉलीबॉल खेळून कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले.

चांदिवली परिसरातील अनेक नाल्यांची सफाई झालेली नाही. याबाबत प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींना जाब विचारल्यास एकमेकांकडे बोट दाखविले जाते. कंत्राटदार नालेसफाई करताना गाळ काढण्यावर भर देत नाहीत. यंदा पावसाळ्यात पाणी तुंबून नागरिकांना त्रास झाला, तर नाल्यातील कचरा पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यालयात टाकण्यात येईल, असा इशारा महेंद्र भानुशाली यांनी दिला आहे.