मुंबई : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. युद्ध झाल्यास देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठीच्या उपाययोजना करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेची माहिती देण्यासाठी बुधवारी मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी युद्ध सराव (माॅकड्रिल) करण्यात येणार आहे. मुंबईतही क्रॉस मैदान येथे दुपारी चार वाजता नागरी संरक्षण विभागाकडून स्वयंसेवकांसह मॉकड्रील करण्यात येणार आहे.
युद्धजन्य आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी नागरी संऱक्षण विभगाकडून सराव करण्यात येणार आहे. नागरी संरक्षण विभागात सध्या १५० जण कार्यरत आहेत. तसेच त्यांचे राज्यभरात १० हजार स्वयंसेवी आहेत. त्यांच्यासह राज्यात विविध ठिकाणी मॉकड्रीलचे आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी माॅकड्रिल करण्यात येणार आहे. त्यात मुंबईतील क्रॉस मैदान परिसरात सर्व स्वयंसेवी व नागरी संरक्षण विभागात अधिकारी दुपारी चार वाजता मॉकड्रील करणार आहेत. यावेळी युद्धजन्य परिस्थितीमध्ये कोणती काळजी घ्यायची, याबाबत स्वयंसेवींना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या मॉकड्रील दरम्यान काही भागांत परिसरात भोंगे वाजतील. हवाई हल्ल्याचा इशारा देण्यासाठी सराव केला जाईल. रात्री हल्ल्यावेळी कोणत्या उपाययोजना करायच्या याबाबत मार्गदर्शन केले जाईल. तसेच विद्युत पुरवठा बंद झाल्यावर काय करावे याबाबत मार्गदर्शन केले जाईल. तसेच महत्त्वाच्या इमारती झाकण्याचा सराव केला जाऊ शकतो. तसेच आणीबाणीच्या स्थितीत नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी हलवण्याबाबतची माहितीही देण्यात येईल. त्याबाबत स्वयंसेवक सराव करतील.
लोकमान्य टिळक टर्मिनसवर आरपीएफचा चोख बंदोबस्त
केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी देशभरात अनेक ठिकाणी युद्धसराव करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली असून मंगळवारी कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसवर रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांकडून सराव करून जवानांनी तेथील बंदोबस्तातही वाढ केली आहे. मुंबई शहरातील महत्वाच्या टर्मिनस पैकी एक असलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रोज ३० ते ३५ गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, कोकण, गोवा आणि दक्षिण भारतात जातात. त्यामुळे तेथील स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यातच सध्या उन्हाळी सुट्या असल्याने रोज ६ ते ७ अतिरिक्त गाड्याही टर्मिनसवरून सोडण्यात येत आहेत. त्यामुळे गर्दीत अधिकच भर पडली आहे. या गर्दीचा मोठा ताण सुरक्षा यंत्रणांवर असताना बुधवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरात अनेक ठिकाणी युद्ध सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या टर्मिनसवर देखील सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली आहे.
मंगळवारी सकाळपासूनच या टर्मिनसवर आरपीएफ जवानांकडून तेथील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. श्वान पथक आणि बॉम्ब शोधक पथकाडून प्रवाशांच्या बॅगांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच प्रवाशांना सतर्क करण्यात येत असून गर्दीत संशयित वस्तू दिसल्यास तत्काळ पोलिसांना त्याची माहिती देण्याचे आदेश प्रवाशांना देण्यात आले आहेत. एखादा हल्ला झाल्यास प्रवाशांनी स्वसंरक्षणासाठी काय करावे याची माहितीही यावेळी देण्यात आली.