मुंबई : होळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करू नये. अनधिकृत वृक्षतोड झाल्याचे आढळून आल्यास त्याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात येईल, तसेच संबंधितांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा  दिला आहे. अनधिकृतपणे वृक्षतोड केल्यास एक ते पाच हजार रुपये दंड करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. वृक्षतोड होत असल्यास महानगरपालिकेच्या मदत क्रमांक ‘१९१६’ वर संपर्क साधावा, असेही आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येत्या गुरुवार, १३ मार्च रोजी होळी असून होळीनिमित्ताने वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास, सतर्क नागरिकांनी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांना व स्थानिक पोलीस ठाण्यास कळवावे किंवा महानगरपालिकेच्या मदत क्रमांक ‘१९१६’ वर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५’ अंतर्गत कलम २१ अन्वये, वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडणे हा गुन्हा आहे. अनधिकृत वृक्षतोडीच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तीला कमीत कमी १ हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. त्यासह एक आठवडा ते एक वर्षांपर्यंत कैदेची शिक्षा देखील होऊ शकते, अशी माहिती उद्यान अधीक्षक तथा वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य सचिव जितेंद्र परदेशी यांनी दिली.

मुंबईत चोहीकडे हिरवळ दाटलेली असावी, यासाठी प्रत्येक मुंबईकराने प्रयत्न करायला हवेत. आपल्या अवतीभवती असलेली निसर्गसंपदा जोपासणे आणि वृद्धिंगत करणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. सर्वांना प्राणवायू देणाऱ्या झाडांचे, वृक्षांचे संरक्षण, संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

मुंबईमध्ये साधारणपणे २९ लाख ७५ हजार झाडे आहेत. त्यापैकी १५ लाख ५१ हजार १३२ झाडे खासगी संस्थांच्या आवारांमध्ये आहेत. तर १० लाख ६७ हजार ६४१ झाडे शासकीय इमारती, तसेच आस्थापनांच्या परिसरांमध्ये आहेत. एकूण झाडांपैकी १ लाख ८५ हजार ९६४ झाडे रस्त्यांंच्या कडेला आहेत. दरवर्षी उद्यान विभागाच्यावतीने नवीन झाडे लावण्यात येतात. विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर झाडे हटवावी लागतात. तसचे पावसाळ्यात सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाच्या तडाख्यात मोठ्या संख्येने झाडे उन्मळून पडतात. त्यामुळे मुंबईतील झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai municipal administration warns of rs 5000 fine for cutting trees during holi mumbai print news amy