मुंबई : मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रूग्णालयातील एका कर्मचाऱ्याने निवृत्ती सोहळ्यानिमित्त सर्व सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक भेट दिल्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी हे पुस्तक देणाऱ्या कर्मचाऱ्यावरच पुस्तके फेकून त्यांना माफी मागायला भाग पाडले. यावरून आता वाद निर्माण झाला असून प्रबोधनकारांचे पुस्तक भेट देण्यात गैर काय, असा सवाल मुंबई महापालिकेतील कामगार संघटनेने केला आहे. निवृत्त कर्मचाऱ्यावर पुस्तके फेकणाऱ्या व अपमान करणाऱ्या सहाय्यक अधिसेविका व संबंधित परिचारिका, तसेच महिला कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कामगार संघटनेने केली आहे.
कस्तुरबा रुग्णालयातील कक्ष अधिकारी राजेंद्र कदम यांनी ३० ऑगस्ट रोजी सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये समाजप्रबोधनात्मक पुस्तकांचे वितरण केले होते. त्यात त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘देव आणि देवळांचा धर्म’ हे पुस्तकही सहकाऱ्यांना वितरित केले होते. मात्र त्यानंतर रुग्णालयाच्या सहाय्यक अधिसेविकेने कदम यांना आपल्या कक्षात बोलवून अपमानित केले. या पुस्तकामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत, असा आक्षेप घेत महिलांनी कदम यांना हे पुस्तक का वाटले असा जाब विचरला. तसेच त्यांना सर्व महिला सहाकाऱ्यांसमोर हात जोडून माफी मागायला लावली. त्यानंतरही महिलांनी कदम यांच्या अंगावर प्रबोधनकारांचे पुस्तक फेकून मारले व या संपूर्ण घटनेची ध्वनीचित्रफित बनवून ती प्रसारित केली. या प्रकरामुळे पालिकेतील वातावरण तापले आहे.
या प्रकरणी बीएमसी एससी, एसटी, व्हिजेएनटी, एसबीसी, ओबिसी एम्प्लॉईज असोसिएशनने आक्षेप घेतला आहे. तसेच पुस्तके फेकणाऱ्या व अपमानित वागणूक देणाऱ्या सहाय्यक अधिसेविका व संबंधीत परिचारिका, तसेच महिला कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
फुले-शाहू- आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये समाजप्रबोधनाचे काम सातत्याने होत आले आहे. समाजप्रबोधन करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असून, पुस्तके लिहिणे- वितरीत करणे, चर्चासत्र आयोजित करणे, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम घेणे हा त्याचाच भाग आहे. प्रत्येक घरातील स्त्रीने बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी लिहलेली पुस्तके वाचून ती नीट समजून घेणे गरजेचे आहे. ज्या व्यवस्थेने स्त्रीला नकळत शारीरिक आणि मानसिक गुलाम केले, त्या स्त्रीने एकदा तरी त्या व्यवस्थेला वाचून समजून घेणे गरजेचे आहे, असे संघटनेचे सरचिटणीस संजय कांबळे -बापेरकर यांनी सांगितले.
समाजसुधारणेवर भाष्य करणारे पुस्तक वितरित करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविताना शासनाने बंदी न घातलेल्या पुस्तकांचे वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्याला ही वागणूक देणे योग्य नाही. ही घटना महापालिका सेवा व नियमावलीचा भंग करणारी असून, दखलपात्र गुन्हा आहे. सबब सहाय्यक अधिसेविका व संबंधित परिचारिका, तसेच महिला कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संघटनेने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.