मुंबई : कल्पना करा की, एकदिवस नळाला पाणीच नाही आले तर…किंवा एक दिवस कचरा नाही उचलला तर… दिवाळीचा सण घरोघरी साजरा केला जात असला तरी मुंबई महापालिकेच्या अत्यावश्यक विभागातील कामगार मात्र मुंबई कधी थांबू नये म्हणून दिवाळीतही कार्यरत असतात. भर दिवाळीत आपण सण साजरे करत असताना पाणी पुरवठा विभागातील चावीवाले, घनकचरा विभागातील सफाई कामगार यांचे हात राबवतच असतात.
मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहराला ३६५ दिवस धावते ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेची यंत्रणा अखंड कार्यरत असते. घनकचरा, पाणी पुरवठा, आरोग्य, अग्निशमन दल असे काही विभाग तर वर्षभर, ३६५ दिवस चोवीस तास कार्यरत असतात. सण, ऊन, वारा, पाऊस काहीही असले तरी या विभागातील कामगार कर्तव्यावर हजर असतात. या कामगारांचे कौतुक करण्यासाठी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी पाणी खात्यातील चावीवाल्या कामगारांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. आयुक्तांच्या या शुभेच्छा म्हणजे जणू मुंबईकरांकडून दिलेली भेटच होती.
रस्त्याच्या मध्येच पाण्याच्या वॉल्व्हची भली मोठी लोखंडी चावी अत्यंत ताकद लावून फिरवताना अनेकदा पालिकेचे कामगार दिसतात. ज्या विभागातील पाणी सोडायचे असते त्या विभागातील जलवाहिनीची कळ अशा पद्धतीने उघडून पाणी पुरवठा सुरू केला जातो. हे काम करणारे चावीवाले सगळे एकाचवेळी कधीच सुट्टीवर जात नाहीत.
वांद्रे ते सांताक्रूझ भागात चावीवाले म्हणून काम करणारे विष्णू भोईर यांनी सांगितले की, आमचे काम आठ आठ तासांच्या तीन पाळ्यांमध्ये चालते. कामात खंड पडू नये म्हणून आम्ही त्या पद्धतीने नियोजन करतो. सणवार असो नाहीतर ऊन पाऊस पाण्याच्या ठरलेल्या वेळा आम्हाला पाळाव्याच लागतात. कधीकधी पावसात छाती इतक्या पाण्यातूनही आम्ही चावी उघडण्यासाठी कामावर हजर होतो. कधी एखाद्या विभागात पाणी गळती सुरू झाली तर तिथला व्हॉल्व्ह बंद करण्यासाठी एकावेळी दहा बारा कामगार लागतात. हे काम जितके अत्यावश्यक स्वरुपाचे आहे, तितकेच ते अंगमेहनतीचेही आहे, असेही भोईर सांगतात.
सुगंधी दिवाळी यांच्यासाठी दूरच…
दिवाळीच्या दिवशी सगळेजण सुगंधी उटणे लावून अभ्यंगस्नान करीत असले किंवा दिवाळी पहाट साजरी करत असले तरी घनकचरा विभागातील कामगारांना मात्र भल्या पहाटे उठून कचरा उचलण्याचे काम करावेच लागते. घनकचरा विभागातील सफाई कामगारांच्या संघटनेचे मिलिंद रानडे यांनी सांगितले की, दिवाळी आणि सुगंध या दुनियेच्या अगदी दुसऱ्या टोकाच्या दुनियेत हे कामगार वावरतात. गुदमरायला होईल इतक्या अस्वच्छ जागेतून कचरा उचलण्याचे काम हे कामगार रोज करतात. अनेकदा चौकीच्या ठिकाणी हात पाय धुवायलाही पाणी नसते. एरव्हीही त्यांच्या सोयींचा विचार केला जात नाही तर दिवाळीच्या दिवशी त्यांनी केलेल्या कामाची सर्वसामान्यांच्या लेखी काहीच किंमत नसल्याचीही खंत रानडे यांनी व्यक्त केली.