मुंबई : शहरात जागोजागी लावण्यात येणाऱ्या अधिकृत फलकांमुळे शहराचे होणारे विद्रुपीकरण टाळण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने तात्पुरत्या स्वरूपातील जाहिरातींसाठी जागा उपलब्ध केल्या आहेत. या ठिकाणी १ हजार १७ जाहिरात फलक, २ हजार ३११ बसस्थानके आणि ३२ हजार ५३१ किऑक्स लावण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. दरम्यान, राजकीय तसेच बिगरराजकीय जाहिरात फलक महानगरपालिकेने परवानगी दिलेल्या अधिकृत जागेवरच लावणे बंधनकारक असून विनापरवाना बॅनर्स, फलक,पोस्टर्स लावणाऱ्यांविरोधात महापालिका कठोर कारवाई करणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना कोणतेही फलक, बॅनर, पोस्टर लावण्यास मनाई आहे. मात्र तरीही मुंबईत सार्वजनिक रस्ते तसेच पदपथांवर महानगरपालिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय फलकबाजी केली जाते. या फलकबाजीवर पालिकेतर्फे वेळोवेळी कारवाई देखील होते. असे असले तरीही अनधिकृत फलकांची समस्या पूर्णपणे मिटलेली नाही. विना परवानगी जाहिरात फलक, बॅनर, पोस्टर लावणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेविरोधात ‘महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा-१९९५’ मधील तरतुदी तसेच ‘मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८’ मधील कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. या तरतुदींचा भंग करताना आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करणे तसेच न्यायालयीन दावा दाखल करणे या कायदेशीर कारवाईंचा समावेश आहे. अनधिकृत फलकांबाबत सातत्याने आवाहन व जनजागृती करूनही या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून येत असल्याने विनापरवाना जाहिरात फलकांवरील पालिकेची कारवाई सुरूच राहणार आहे.

न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, व्यावसायिक पक्षकार आदींचे पदाधिकारी, प्रतिनिधी यांना महानगरपालिका प्रशासनाने लेखी पत्र पाठविले आहे. सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, पदपथांवर विनापरवाना जाहिरात फलक, बॅनर्स, पोस्टर्स प्रदर्शित करू नये, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे. जाहिरातदारांनीदेखील विहित प्रक्रियेचे पालन करून परवानगी दिलेल्या जागेवरच जाहिराती प्रदर्शित करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. या संदर्भात २४ विभाग कार्यालयातील अधिका-यांची बैठक घेऊन विनापरवाना फलकांवर कठोर कारवाईचे तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आल्याचे उप आयुक्त चंदा जाधव यांनी सांगितले.

टोल फ्री क्रमांकावर तक्रारीची सुविधा

विनापरवाना आणि अनधिकृत जाहिरात फलक तसेच बॅनरविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांनी १९१६ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. विनापरवाना प्रदर्शित केलेल्या जाहिरात फलकांविरोधात तक्रार नोंदविण्याची सुविधा महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर http://www.mcgm.gov.in आणि @mybmc या समाजमाध्यमांवरही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai municipal corporation provided space for temporary advertisements mumbai print news asj