मुंबई : मुंबईकरांना वर्दळीच्या ठिकाणी विनाअडथळा आणि मोकळेपणाने चालता यावे, यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. आता पालिकेने या कारवाईसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत वर्दळीच्या ठिकाणी असलेले अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत बांधकामे तसेच वाहतूक आणि पादचाऱ्यांना मार्गक्रमण करण्यात अडथळा ठरणाऱ्या बाबींचे तात्काळ निष्कासन केले जात आहे. मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांलगतचे परिसर पादचाऱ्यांच्या मार्गक्रमणासाठी सुलभ ठेवावेत, असे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईतील वाहतूक सुलभ आणि सोयीची व्हावी, पादचाऱ्यांना विनाअडथळा चालता यावे, या उद्देशाने महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी यांच्या आदेशांनुसार, अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण, रस्त्यांची स्वच्छता, फेरीवालामुक्त परिसर आदी बाबींचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर पादचाऱ्यांना सुलभरित्या मार्गक्रमण करता यावे, या हेतूने नियमित कारवाईसोबत विशेष मोहिमही हाती घेण्यात आली आहे.

याच अनुषंगाने, महानगरपालिकेच्या एफ उत्तर विभागाच्या वतीने संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली. यासाठी परिरक्षण, घनकचरा व्यवस्थापन, परवाना, अतिक्रमण निर्मूलन, इमारत प्रस्ताव, आरोग्य, आस्थापना, पाणीपुरवठा आदी विभागांचे पथक बनविण्यात आले. परिसर स्वच्छता, पदपथांवरील अतिक्रमण हटवणे, अनधिकृत फेरीवाले हटवणे, बेवारस वाहने हटवणे, प्रतिबंधित प्लास्टिक बॅग बाळगणाऱ्यांवर कारवाई आदी बाबी या पथकांच्या संयुक्त मोहीमेत करण्यात आल्या.

रेल्वे स्थानक परिसरही अतिक्रमणमुक्त होणार

महानगरपालिकेच्या विविध प्रशासकीय विभागांच्या वतीनेही पादचाऱ्यांच्या सुलभ मार्गक्रमणासाठी अधिक तीव्रपणे कारवाई सुरू केली आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, चर्चगेट रेल्वे स्थानक, मशीद रेल्वे स्थानक, सँडहर्स्ट रेल्वे स्थानक, रे रोड रेल्वे स्थानक, डॉकयार्ड रेल्वे स्थानक, माझगाव रेल्वे स्थानक, भायखळा रेल्वे स्थानक, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक परिसर आदी ठिकाणांचा समावेश आहे. विशेषता वर्दळीच्या ठिकाणी पदपथांवरून चालताना पादचाऱ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, हे सुनिश्चित केले जात आहे. यापुढेही नियमितपणे कारवाई करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पालिकेतर्फे सातत्याने कारवाई

मुंबईतील बहुतांश रस्त्यांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. तर, उर्वरित रस्ते अनधिकृत बांधकामांनी गिळंकृत केले आहेत. महानगरपालिका प्रशासनातर्फे सातत्याने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते. मात्र, ही समस्या सोडविण्यात पालिकेने पूर्णपणे यश मिळालेले नाही. शिवाय अनधिकृत बांधकामांवरही पालिकेमार्फत निष्कासनाची कारवाई केली जाते. गेल्या काही दिवसांपासून या कारवाईला वेग देण्यात आला आहे. तसेच, आता या कारवाईसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai municipal corporation takes strict action against unauthorized constructions and hawkers mumbai print news zws