मुंबई : घराघरातील घातक कचरा संकलित करण्याच्या सेवेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. याअंतर्गत आता जुने मोबाइल, चार्जर, बॅटरी, संगणक आदी ई कचरा गोळा करण्यात येणार आहे. तसेच पाळीव प्राण्यांची विष्ठाही संकलित करण्याचे मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने ठरवले आहे. त्यासाठी नागरिकांना नोंदणी करावी लागणार आहे.
वापरलेले सॅनिटरी पॅडस्, डायपर, कालबाह्य औषधे आदींच्या संकलनासाठी मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा संकलन सेवेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. याअंतर्गत ३ मेपासून पाळीव प्राण्यांची विष्ठा संकलनाची सेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच ई-कचरा संकलनासाठी सोमवारी ५ मेपासून स्वतंत्र सेवा सुरू करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेने नागरिकांच्या वैयक्तिक वापराशी संबंधित कचरा संकलनासाठी ‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन’ (डॉमेस्टीक सॅनिटरी अँड स्पेशल केअर वेस्ट कलेक्शन) ही सेवा २२ एप्रिलपासून सुरू केली आहे. या सेवेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.
सेवेसाठी ३०७ नोंदणी
‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन’ सेवा सुरू झाल्यापासून २ मेपर्यंत एकूण ३०७ नोंदणी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये १४८ गृहनिर्माण संस्था, १३५ श्रृंगार केंद्र (ब्युटी पार्लर), १७ शैक्षणिक संस्था आणि ७ महिला वसतिगृहांचा समावेश आहे, अशी माहिती उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी दिली.
पाळीव प्राण्याची विष्ठाही संकलित होणार
ही सेवा सुरू झाल्यानंतर मिळालेला प्रतिसाद आणि नागरिकांच्या विनंतीनुसार महानगरपालिका आता पाळीव प्राण्यांच्या विष्ठेचे संकलन या सेवेद्वारे करणार आहे. ‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलना’साठी यापूर्वीच ऑनलाईन लिंक आणि क्यू आर कोड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्येच पाळीव प्राणी विष्ठा संकलन सुविधेसाठी नोंदणी करता येईल.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc6zR8XHoOzXRNanCCdj4oKtS27Iu7vuaXBANiCGoKCfUCn5g/viewform या लिंकवर जाऊन किंवा विविध ठिकाणी उपलब्ध, तसेच मुंबई महानगरपालिकेच्या समाज खात्यावर प्रसिद्ध करण्यात आलेले क्यूआर कोड स्कॅन करून ही नोंदणी करता येईल.
ई-कचरा संकलन सेवाही उपलब्ध
मुंबईमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात ई-कचरा तयार होतो. या धोकादायक स्वरूपाच्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे व पुनर्प्रक्रिया, तसेच पुनर्वापर करणे आवश्यक आहे. ई-कचरा सर्वसाधारण कचऱ्यात मिसळल्यामुळे त्यातील शिसे (लीड), पारा (मर्क्युरी), कॅडमियम यांसारख्या विषारी घटकांमुळे पर्यावरण आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ई-कचरा संकलन करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे मुंबई महापालिकेने ठरवले आहे. याअंतर्गत निरुपयोगी मोबाइल, चार्जर, बॅटरी, संगणक, दूरचित्रवाणी संच आणि लहान उपकरणांसारख्या तत्सम सर्व ई-कचऱ्याचे संकलन केले जाईल. ई-कचरा संकलनासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSemTxY-ifCjxU7VW-U7sYpr8JOD_Zj4XKnDB7uVpJyXsk6LxA/viewform?usp=header ही स्वतंत्र लिंक उपलब्ध करण्यात आली आहे.