मुंबई : हौशी, तसेच महाविद्यालयीन कलाकार आणि तंत्रज्ञांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी मराठी रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेचे म्हणजेच नाट्य परिषद करंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रसिद्ध अभिनेते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली.

‘नाट्य परिषद करंडक’ स्पर्धा प्राथमिक व अंतिम फेरी अशा दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे. २३ आणि २४ ऑगस्ट रोजी विविध केंद्रांवर प्राथमिक फेरी पार पडणार आहे. या फेरीतून २५ कलाकृतींची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येणार आहे. या २५ एकांकिकांमध्ये महाअंतिम फेरी मुंबईतील माटुंगा रोड (पश्चिम) येथील यशवंत नाट्य मंदिर येथे १५, १६, १७ व १८ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. तसेच अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.

एकांकिका स्पर्धेची माहिती, नियमावली व सविस्तर तपशील http://www.natyaparishad.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. १० ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ७ पर्यंत स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज भरता येणार आहे. अधिक माहितीसाठी ८५९१७०६८८७ या क्रमांकावर संपर्क साधावा.