मुंबई : पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीने कारागृहातील तुरुंग रक्षकावर हल्ला केला. या हल्ल्यात तुरुंग रक्षकाच्या डोळ्यांना दुखापत झाली आहे. याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, शनिवारी अश्फाक खान आणि दुसरा कैदी इम्तियाज शेख यांच्यात भांडण झाले होते. या वेळी तुरुंग रक्षक राकेश चव्हाण परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी पुढे आले. त्यावेळी खानने चव्हाण यांच्यावरच हल्ला केला. त्याने चव्हाण यांना मारहाण केली. या हल्ल्यात चव्हाण यांच्या डोळ्याला इजा झाली. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले. एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात खानविरोधात सार्वजनिक सेवकाच्या कर्तव्यात अडथळा आणल्याचा, तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत (बीएनएस) विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आरोपी खान कुख्यात टोळीचा सदस्य

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खान याला पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. अमली पदार्थविरोधी कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यात आला होता. त्या टोळीत आश्फाक खानचा समावेश होता.