मुंबई : Mumbai Pune Expressway मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक अधिक जलद आणि सुरक्षित करण्यासाठी या मार्गाच्या आठपदरीकरणाचा प्रस्ताव अखेर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) राज्य सरकारकडे सादर केला आहे. राज्य सरकारने प्रस्तावाला मंजुरी दिल्यास वर्षभरात कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. हे काम दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई ते पुणे अंतर कमी करण्यासाठी ९४.५ किमीचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग बांधण्यात आला. २००२ मध्ये हा मार्ग पूर्णत: वाहतुकीसाठी खुला झाला. या मार्गामुळे चार ते पाच तासांचा मुंबई-पुणे प्रवास दोन ते अडीच तासांवर आला. आज राज्यातील सर्वात महत्त्वाचा आणि वर्दळीचा असा हा मार्ग मानला जातो. दररोज यावरून अंदाजे एक लाख ५५ हजार वाहने धावतात. मात्र आता हा  मार्ग अपुरा पडू लागला आहे. तर भविष्यात ही वाहनसंख्या आणखी वाढणार आहे. अशा वेळी सहापदरी मार्गाचे आठपदरीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

वाहनसंख्या प्रचंड वाढल्याने मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर अपघातांची भीती वाढली आहे. या सर्व बाबी लक्षात घेता अखेर एमएसआरडीसीने मार्गाच्या आठपदरीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नुकताच यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

२०२७-२८ ची प्रतीक्षा..

महत्त्वाचे म्हणजे या द्रुतगती मार्गाचे काम सुरू झाल्यापासून तीन वर्षांत काम पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे, तर हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मार्गाची क्षमता वाढणार असून वाहतूक कोंडी कमी दूर होणार आहे. तर महामार्ग सुरक्षित होण्यास मदत मिळणार असल्याचा दावा यानिमित्ताने केला जात आहे; पण यासाठी २०२७-२८ उजाडण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai pune expressway soon to be eight lane proposal of msrdc to state govt ysh