Mumbai Rain 2005 : २६ जुलै ही तारीख मुंबईकरांच्या मनात कायमची घर करुन बसली आहे. महाभारतात जसा अश्वत्थाम्याला जखम घेऊन वावरण्याचा अमरत्वाचा शाप मिळाला होता ना अगदी तशीच ही तारीख आहे. मुंबईच्या महाभारतातील अश्वत्थाम्याची जखम म्हणजे २६ जुलै २००५ चा दिवस. खरंतर हा दिवस नेहमीसारखा मुंबईच्या वेगात आणि जोशात सुरु झाला होता. मात्र सकाळी ११ च्या नंतर पावसाचा जोर वाढला. सुरुवातीला वाटलं की इतका पाऊस तर मुंबईत पडतोच. पण नंतर प्रत्येकाला कळलं हा इतका पाऊस कधीच पडत नाही. २६ जुलै २००५ या दिवशी मुंबईत ९९४ मिमि पावसाची नोंद झाली होती.
एका दिवसात ९९४ मिमि पावसाची नोंद
२६ जुलै २००५ च्या त्या भयाण दिवशी मुंबईत २४ तासांत एरवी जून ते सप्टेंबर अशा चार महिन्यांत मिळून पडणारा ९४४ मिमि पाऊस झाला. दुपारनंतर पाऊस ओसरायची चिन्हं दिसेना म्हटल्यावर ऑफिसमधून कित्येक जण बाहेर पडले, मात्र, प्रचंड कोसळणाऱ्या पावसामुळे रस्ते वेगाने पाण्याखाली जात होते. रिक्षा, कार्स, टॅक्सी, बेस्ट बस यांची चाकं पाण्यात बुडाल्यामुळे त्यांनाही पुढे जाता येत नव्हतं. ट्रक आणि इतर मोठी वाहनंही अडकून पडली होती. रस्त्यावरून वाहाणाऱ्या पाण्याचा जोर इतका होता की, चालत जाणंही शक्य नव्हतं. आसरा घ्यायलाही लोकांना जागा मिळत नव्हती. त्या पुरातही चालत जाण्याचा प्रयत्न केलेले कित्येक जण पापणी लवण्याच्या आत वाहून गेले, तर गाडीत पाणी शिरू नये म्हणून काचा बंद करून आत बसलेल्या अनेकांचा गुदमरून जीव गेला. मुंबईने त्यादिवशी पावसाचं तांडव काय असतं आणि मृत्यूचं तांडव काय असतं ते पाहिलं.
तीन दिवस मुंबईच्या वेगाला ब्रेक
मुंबईकरांना इतका पाऊस पाहण्याची सवय कधीही नव्हती. मात्र त्या दिवशी ज्यांनी तो पाऊस पाहिला त्यांना पावसाचं तांडवही पाहण्यास मिळालं. मुंबईतला त्या दिवशीचा पाऊस हा भीती, धास्ती, काळजी आणि चिंता वाढवणारा होता. २६ जुलैच्या या पावसानंतर वेगात पळणाऱ्या मुंबईला २८ जुलैपर्यंत ब्रेक लागला होता. कारण पाणी ओसरण्यास वेळ गेला, मालमत्तेचं नुकसान हे साधारण ५०० कोटींच्या घरात होतं. शिवाय २६ जुलैला मुंबईतून पायी निघालेले अनेक चाकरमानी दोन दिवसांनी घरी पोहचले होते. ठप्प शब्दाचा अर्थ काय असतो ते या तीन दिवसांनी मुंबईला दाखवून दिलं.
मुंबईची लोकल सेवा दहा दिवस ठप्प
२६ जुलैच्या पावसामुळे दिवशी तब्बल ३७ हजार रिक्षा, ४ हजार टॅक्सी आणि ९०० बेस्ट बसेसचं नुकसान झालं. तर हजारो मोठी वाहनं पाण्यात अडकली. यामुळे कोट्यवधीचं नुकसान झालं, एवढंच नाही या महाभयंकर पावसाचा गंभीर परिणाम हा विमानसेवेवरही झाला. ७०० हून अधिक उड्डाणं रद्द करावी लागली होती. मुंबईची लाईफलाईन असं ज्या मुंबई लोकलचं वर्णन केलं जातं ती सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. ही लोकल सेवा पूर्ववत होण्यास दहा दिवस लागले होते, याचं कारणही तसंच होतं. कल्याण ते कसारा मार्गावरचा रेल्वे मार्ग खचला होता. त्यामुळे तो दुरुस्त करण्याचं काम दहा दिवस चाललं होतं.
मृत्यूचं थैमान काय असतं ते मुंबईकरांनी अनुभवलं
मुंबईतला हा महाभयंकर पाऊस मुंबईकरांसाठी जीवघेणाही ठरला. २६ जुलै २००५ च्या पावसामुळे एक हजारांहून अधिक लोकांचा जीव गेला. मुंबईतली जवळपास १४ हजार घरं उद्ध्वस्त झाली. मुंबईतील इमारती, वस्त्यांमध्ये पाणी घुसून अनेकांचे संसार वाहून गेले. लोकलमध्ये अडकलेल्या शेकडो लोकांनीही रूळांवरून वाट काढत नाहीतर स्टेशनवरच आसरा घेण्याचा प्रयत्न केला. कार्यालयात थांबलेले लोक अक्षरशः दोन दिवस तिथेच अडकून पडले होते, तर बाहेर पडलेले, जीव वाचलेले लोक आठ- दहा तासांच्या पायपिटीनंतर घरी पोहोचले होते. घरी लहान मुलांना ठेवून कामावर येणाऱ्या पालकांची स्थिती आणखीनच वाईट होती. मुंबईवर कोपलेल्या पावसानं त्या दिवशी तब्बल एक हजारांहून अधिक नागरिकांचे जीव घेतले. २६ जुलैच्या या महाभयंकर प्रलयाला आज वीस वर्षे झाली आहेत. मात्र मुंबईकरांच्या मनात या पावसाची भीती अजूनही बसलेली आहे.