Mumbai Local Train Updates Today, 27 Sep 2024: बुधवारचा मुसळधार पाऊस आणि रात्री कामावरून घरी परतताना दोन तासांचा मध्य रेल्वेचा खोळंबा या मनस्तापातून सावरत मुंबईकरांनी गुरुवारी कामाला सुरुवात केली खरी. पण पावसाचं अद्याप समाधान झालेलं नाही. शहरासह महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसानं गुरुवारप्रमाणेच शुक्रवारी पहाटेपासूनच दमदार हजेरी लावली आहे. मुंबईत २७ सप्टेंबर रोजी हवामान विभागानं ऑरेंज अॅलर्ट दिला आहे. हवमान विभागाचा अंदाज खरा ठरवायचा म्हणून की काय, अगदी पहाटेपासूनच मुंबईवर काळ्या ढगांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आजही मुंबईकरांना पाऊस, ओलावा, खड्डे, त्यातलं पाणी आणि लोकल पकडण्यासाठीची धावपळ करावी लागेल असं चित्र सध्या दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पावसाचा काय अंदाज?

हवामान विभागानं अंदाज वर्तवल्याप्रमाणे २७ सप्टेंबर अर्थात आज मुंबईत मुसळधार पाऊस (Mumbai Rain Status) होण्याची शक्यता आहे. आज दिवसभरात मुंबईसह राज्याच्या विविध भागांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाशिकमध्ये हवामान विभागानं रेड अलर्ट दिला असून पालघर, पुणे, नंदुरबार व धुळ्यात मुंबईप्रमाणेच ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याशिवाय, आजच्या दिवशी महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक शहरात यलो अलर्ट देण्यात आल्याचं वृत्त फायनान्शियल एक्स्प्रेसनं दिलं आहे.

मुंबईत आज तापमान २३ अंश सेल्सिअस ते ३१ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. दिवसभरात पाऊस किंवा ढगाळ वातावरण असा अनुभव मुंबईकरांना येऊ शकतो. २९ सप्टेंबरपर्यंत शहरात असंच वातावरण असू शकतं.

मुंबईच्या लोकल वाहतुकीचं काय?

पावसाळ्यात मुंबईकरांना सर्वाधिक चिंता असते ती लोकल सेवा व्यवस्थित चालू राहण्याची. अनेकदा पावसामुळे किंवा रेल्वे ट्रॅकवर पाणी साठल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं आहे. बुधवारी रात्रीदेखील कांजूरमार्ग, विक्रोळी या परिसरात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल २ तास विस्कळीत झाली होती.

आज मध्य रेल्वे अथवा पश्चिम रेल्वेकडून लोकल सेवा उशीराने किंवा विस्कळीत असण्याची कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही. मुंबईतील तिन्ही मार्गिका अर्थात मध्य, पश्चिम व हार्बरवरील लोकल सेवा सकाळच्या सुमारास सुरळीत चालू आहेत. काही ठिकाणी अंदाजे १० मिनिटे वाहतूक उशीराने चालू आहे. मात्र, त्याव्यतिरिक्त मुंबईची लोकल सेवा सुरळीत चालू आहे. दरम्यान, मध्य रेल्वेवर कसारा ते उंबरमाळी या स्थानकांदरम्यान शुक्रवारी काामनिमित्त ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mumbai Rain: “वेलकम हिंदमाता वॉटर पार्क”, मुसळधार पावसानंतर दादरमधील ‘तो’ VIDEO पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, “बीएमसीला ऑस्कर…”

गुरुवारी पाऊस व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या ट्रॅफिक जॅममुळे मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विशेषत: पश्चिम द्रुतगती मार्गावर हे दिसून आलं. शुक्रवारीही शहरात मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे घरातून बाहेर पडताना वाहतूक खोळंब्याचा काही प्रमाणात सामना करावा लागू शकतो, याची तयारी ठेवूनच मुंबईकरांनी बाहेर पडावं, असं आवाहन केलं जात आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai rain updates central railway local train delay imd orange alert in city pmw