मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीच्या रुपेरी पडद्यावर लवकरच एक थरारक व विनोदी चित्रपट अवतरणार आहे. नवीन वर्षात म्हणजेच ९ जानेवारी २०२६ पासून ‘रावण कॉलिंग’ हा धमाल मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचे मोशन फलक प्रदर्शित करण्यात आले. त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.‘रावण कॉलिंग’ चित्रपटाच्या मोशन फलकावर आगीच्या ज्वाळांमध्ये जळणारी रावणाची मूर्ती दाखविण्यात आली आहे.

धगधगत्या आगीतून उमटणारी ही छबी प्रेक्षकांना एका अनोख्या आणि रोमांचकारी प्रवासाची चाहूल देणारी आहे. गोल्डन गेट प्रॅाडक्शन निर्मित आणि मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘रावण कॉलिंग’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अभिषेक गुणाजी आणि संदीप बंकेश्वर यांनी एकत्रितपणे सांभाळली आहे. विशेष बाब म्हणजे ज्येष्ठ अभिनेते मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजी यांचा पूत्र अभिषेक गुणाजी या चित्रपटातून पहिल्यांदाच दिग्दर्शनात पदार्पण करीत आहे. यामध्ये सचित पाटील, वंदना गुप्ते, सोनाली कुलकर्णी, पूजा सावंत, गौरव घाटणेकर, रवी काळे आणि मिलिंद गुणाजी अशी दिग्गज कलाकारांची फौज झळकणार आहे.

दिग्दर्शक अभिषेक गुणाजी म्हणाले की, ‘रावण कॉलिंग’ हा माझा पहिलाच दिग्दर्शनाचा अनुभव आहे. हा चित्रपट अनेक सरप्राईजेसने आणि ट्विस्ट्स ॲण्ड टर्न्सने भरलेला आहे. जबाबदारी खूप मोठी आहे. मी त्याला शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आता प्रेक्षकांचे प्रेम आणि प्रतिसाद मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे’. तर दिग्दर्शक संदीप बंकेश्वर म्हणाले की, ‘विषय वेगळ्या धाटणीचा असून हा एक धमाल चित्रपट आहे. अशा ताकदीच्या आणि अनुभवी कलाकारांसोबत काम करणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता. आम्हाला खात्री आहे की प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच भावेल’.

दरम्यान, ‘रावण कॉलिंग’ चित्रपटाचे कथानक अद्याप गुप्त ठेवण्यात आले असले, तरी हा एक विनोदी, थरारक आणि प्रत्येक वळणावर काहीतरी ट्विस्ट्स घेऊन येणारा चित्रपट आहे. यातील दमदार कलाकारांची एकत्रित कामगिरी प्रेक्षकांना एक अनोखा सिनेमॅटिक अनुभव देणार हे निश्चित आहे.