पुणे/मुंबई : देशात उशिराने दाखल झालेल्या आणि पोषक वातावरणाअभावी किनारपट्टीवरच रेंगाळलेल्या मोसमी वाऱ्यांनी रविवारी वेग पकडला. अपवाद वगळता संपूर्ण देश मोसमी वाऱ्यांनी व्यापला आहे. मुंबईसह उपनगरांतही रविवारी सकाळी मोसमी वाऱ्याच्या सरी बरसल्या. यंदा दहा दिवस उशिराने मोसमी वारे मुंबईत दाखल झाले आहेत.
हवामान विभागाकडून रविवारी मोसमी पाऊस संपूर्ण राज्यात दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी रविवारी मुंबईत पावसाचा जोर कमी होता. दुपापर्यंत मुंबई शहरात १० ते २० मिलिमीटर तर उपनगरांमध्ये ५ ते १० मिलिमीटर पाऊस झाला. शनिवारी मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई, पालघर या भागांमध्ये पूर्व मोसमी सरी बरसल्यानंतर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. रविवारी दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे हवामान खात्याने हा इशारा मागे घेतला.
पहिल्या पावसात मुंबई जलमय
मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्याच्या बहुतांश भागांत पावसाने शनिवारी सकाळपासून हजेरी लावली होती. पहिल्याच पावसाने मुंबईच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले होते. पावसामुळे मुंबई शहर आणि उपनगरात ३८ वृक्ष उन्मळून पडले. मोगरा नाल्यातून ताडपत्री, रबरी पाईप इत्यादी साहित्य वाहून आल्यामुळे अंधेरी भूयारी मार्गात पाणी साचले होते.
दहा दिवसांचा विलंब
सर्वसाधारणपणे दरवर्षी मोसमी पाऊस केरळमध्ये १ जूनला दाखल होतो. त्यानंतर ७ जूनला राज्यात दाखल होतो. मात्र, यंदा मोसमी पावसाने केरळमध्ये ८ जून रोजी हजेरी लावली तसेच ११ जूनला तळकोकणात पाऊस झाला. मोसमी पाऊस संपूर्ण महाराष्ट्र १५ जूनपर्यंत व्यापतो. यंदा त्याला दहा दिवसांचा विलंब झाला आहे.
पाच दिवस मुसळधार?
हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी पुण्यामध्ये सांगितले की, बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. अरबी समुद्रात गुजरात किनाऱ्यावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टी, पूर्व किनारपट्टी तसेच मध्य भारतात पुढील चार-पाच दिवस चांगला पाऊस अपेक्षित आहे. पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे आणि मुंबईला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून तिथे चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईत पाऊस
कधी आला?
२०२३ – २५ जून
२०२२ – ११ जून
२०२१ – ९ जून
२०२० – १४ जून