मुंबई : माणगाव तालुक्यातील खांदाड गावात दुर्मिळ खवले मांजर आढळले असून गावातील तरुणांनी खवले मांजर वनविभागाकडे सुपूर्द केले.खांदाड गावात शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास स्थानिक रहिवासी राजू पवार दुचाकीवरून सोनभैरव मंदिराकडे जात असताना त्यांना खवले मांजर दिसले. गावातील मंदिर परिसरात ग्रामसभा असल्याने तेथे नागरिकांची गर्दी होती. ग्रामस्थांनी तत्काळ माणगावचे वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांच्याशी संपर्क साधला. शंतनु कुवेसकर तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी हा प्राणी खवले मांजर असल्याचे सांगत गावकऱ्यांना त्याच्या संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी लगेचच वनविभागाला याबाबत माहिती दिली.
वनपाल डी. एस. सुभेदार व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल होईपर्यंत गावकऱ्यांनी या प्राण्याची काळजी घेत त्याचे संरक्षण केले. दरम्यान, शंतनु कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली खवले मांजर वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. उप वनसंरक्षक शैलेंद्रकुमार जाधव व सहाय्यक उप वनसंरक्षक रोहीत चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या सूचनेनुसार वनरक्षक वैशाली भोर यांच्या पथकाने खवले मांजराला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडले.
पूरामुळे भरकटल्याची शक्यता
खांदाड परिसरात घनदाट जंगल नाही, तसेच या भागात खवले मांजराचा अधिवास नाही. मात्र सध्या काळ नदीला पूर आल्यामुळे पश्चिमेकडील जंगलातून खवले मांजर वाहून येथे आले असावे, असा अंदाज वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
खवले मांजर अत्यंत दुर्मिळ व जगात सर्वाधिक तस्करी होणारा प्राणी आहे. खांदाड ग्रामस्थांनी अत्यंत संवेदनशीलपणे त्याचे रक्षण करून स्तुत्य कार्य केले.शैलेंद्रकुमार जाधव, उपवनसंरक्षक