मुंबई : शिवसेनेची दोन शकले पडल्यानंतर अनेक माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला. या माजी नगरसेवकांचे आरक्षणात काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. बहुतांशी महिला माजी नगरसेविकांचे प्रभाग राखले गेले आहेत. मात्र माजी नगरसेवकांना आरक्षणाचा फटका बसला आहे.
शिवसेनेतील (शिंदे) चेंबूर अणुशक्तीनगरमधील प्रभाग क्रमांक १४६ च्या माजी नगरसेविका समृद्धी काते अनुसूचित जातीमधून निवडून आल्या होत्या. त्यांच्या प्रभागातील आरक्षण कायम आहे. विक्रोळी येथील प्रभाग क्रमांक ११७ मधील सुवर्णा कारंजे यांच्या प्रभागातील ओबीसी महिला आरक्षण कायम आहे. दहिसरमधील प्रभाग क्रमांक ७ च्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या प्रभागातील आरक्षणही कायम आहे. दिंडोशीतील विनया सावंत, वर्सोवाच्या राजुल पटेल यांच्याही प्रभागातील आरक्षण कायम आहे.
या महिला नगरसेविकांना फटका
अणुशक्तीनगरमधील प्रभाग क्रमांक १४७ मधील माजी नगरसेविका अंजली नाईक ओबीसी गटातून निवडून आल्या होत्या. यावेळी त्यांचा प्रभाग अनुसूचित जातीं महिलांसाठी राखीव झाला आहे. जोगेश्वरी येथील प्रभाग क्रमांक ५३ मधील रेखा रामवंशी अनुसूचित जातीमधून निवडून आल्या होत्या. आता हा प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आहे. विक्रोळी येथील प्रभाग क्रमांक १२१ मध्ये अनूसूचित जाती महिला विभागातून निवडून आलेल्या चंद्रावती मोरे यांचा प्रभाग अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित झाला आहे. दहिसर येथील प्रभाग क्रमांक ११ मधील रिद्धी खुरसुंगे, प्रभाग क्रमांक १२ मधील गीता सिंघण, प्रभाग क्रमांक १८ मधील संध्या दोषी, प्रभाग क्रमांक १२८ मधील अश्विनी हांडे महिला सर्वसाधारण गटातून निवडून आल्या होत्या. त्यांचे प्रभाग आता ओबीसीसाठी राखीव झाले आहेत.
