मुंबई : मुंबईवर अनेक मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित संकटे आली. अशा आपत्तीकाळात मुंबईकरांचा प्रतिसाद आणि त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची सक्षमता नेहमीच वाखाणली गेली आहे. आपत्तीसमयी चोरी, लूटमार, अत्याचार असे अनुचित प्रसंग मुंबईत घडलेले नाहीत. आपत्कालीन परिस्थितीतही, मुंबईकरांचे मनोधैर्य आणि परस्परांना मदतीची भावना अधिक मजबूत असते. संकटाच्या काळातही मुंबईकर एकोप्याने उभे राहतात, असे गौरवोद्गार महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी काढले.

संयुक्त राष्ट्रसंघाचे आपत्ती जोखीम सौम्यीकरण कार्यालय व मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नागरी आपत्ती जोखीम सक्षमता’ या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे ८ ते १० सप्टेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी गगराणी बोलत होते.

महानगरपालिका प्रशासनाला आपत्कालीन व्यवस्थापनाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि सर्वोत्तम उपाययोजना राबवण्याचा विश्वास आहे. असे असूनही त्यावर समाधान न मानता, जागतिक स्तरावरील आपत्कालीन व्यवस्थापनाची धोरणे, संशोधन, उपाययोजना आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे. आजच्यापेक्षा अधिक आणि उत्तम आपत्कालीन व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. वेळीच उपाययोजना केल्या तर संभाव्य नुकसान कमी करता येते तसेच संभाव्य दुर्घटना टाळता येतात, असे गगराणी यांनी नमूद केले.

दरम्यान, नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांचा सामना करण्यासाठी महानगरपालिका सदैव सज्ज आणि सक्षम आहे. आपत्ती निवारण अंतर्गत जोखमींचे सौम्यीकरण करण्यासाठी नदी पुनरुज्जीवन योजना, ब्रिमस्टोवॅड प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया केंद्रे अशा अनेक महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधांवर भर देण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. जगभरात सुरू असलेले संशोधन, अत्याधुनिक उपाययोजना आदींचा स्वीकार करून मुंबई अधिकाधिक सुरक्षित, सक्षम बनविण्यासाठी महानगरपालिका सदैव प्रयत्नशील असल्याचा असे गगराणी यांनी नमूद केले.

यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल सूद गोयल, संयुक्त राष्ट्रसंघाचे आपत्ती जोखीम सौम्यीकरण कार्यालयाचे जागतिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख संजय भाटिया, कार्यक्रम व्यवस्थापन अधिकारी मुतालिका प्रुक्सापॅंग, इंचाव एनव्हायरनमेंटल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉ. गईवून कोई आदी मान्यवरांसह महानगरपालिका क्षेत्रातील विविध शासकीय व निमशासकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आपत्कालीन परिस्थितीत जोखमीची व्याप्ती समजून घेणे, प्रशासनाचे प्रयत्न समजून घेणे, आपत्तीविषयक पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणे, स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी पूर्वतयारी करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. प्राणहानीसोबतच वित्तहानी टाळणे तसेच पायाभूत सुविधांचे नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी उपाययोजना असायला हवी, असे मत केपीएमजी संस्थेचे भागीदार व शासकीय आणि सार्वजनिक सेवा प्रमुख नीलाचल मिश्रा यांनी व्यक्त केले.