मुंबई: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) पुणे – बंगळुरू द्रुतगती महामार्ग बांधत असून या महामार्गाचा मुंबईपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. या विस्ताराअंतर्गत मुंबई – पुणे प्रवासासाठी तिसरा महामार्ग उपलब्ध होणार आहे. अशा या महत्त्वाकांक्षी मुंबई – पुणे – बंगळुरू महामार्गातील पागोटे – चौक या २९.१२९ किमीच्या टप्प्याच्या कामाला नवीन वर्षात सुरुवात करण्याचे एनएचएआयचे नियोजन आहे. त्यानुसार एनएचएआयने एकीकडे भूसंपादनाच्या कामाला वेग दिला आहे. आता दुसरीकडे पागोटे – चौक टप्प्याच्या बांधकामासाठी दिवाळीनंतर निविदा प्रसिद्ध करण्याची तयारी सुरू केली आहे. डिसेंबरअखेरपर्यंत निविदा अंतिम करून नवीन वर्षात महामार्गाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

एनएचएआयने ८३० किमी लांबीचा मुंबई पुणे – बंगळुरू द्रुतगती महामार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. पुणे – बंगळुरू महामार्गाचे काम सुरू असून मुंबई – पुणे महामार्गातील पागोटे – चौक दरम्यानच्या २९.१२९ किमी लांबीच्या महामार्गाचा आराखडा तयार झाला आहे. तर चौक – पुणे, शिवारे दरम्यानच्या अंदाजे १०० किमी लांबीच्या टप्प्याच्या आराखड्याचे काम सुरू आहे. पागोटे – चौक आणि चौक – पुणे, शिवारे महामार्ग तयार झाल्यास मुंबई – पुण्यासाठी तिसरा द्रुतगती महामार्ग तयार होणार आहे. त्यामुळे सध्या सेवेत दाखल असलेल्या मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील ताण कमी होण्यास मदत होईल. अशा या तिसऱ्या मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गातील पागोटे – चौक द्रुतगती महामार्गाचे प्रत्यक्ष काम लवकरात लवकर सुरू करण्याच्यादृष्टीने एनएचएआयने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ३६५३ कोटी रुपये खर्चाच्या या महामार्गासाठी रायगडमधील तीन तालुक्यातील १७५.९४ हेक्टर जागा संपादीत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत ६० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून येत्या काही महिन्यात १०० टक्के भूसंपादन पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे एनएचएआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

पागोटे – चौक महामार्गासाठी १७५.९४ हेक्टरसह आणखी काही हेक्टर जागा संपादीत करण्याची गरज आहे. त्यानुसार शनिवारी या अतिरिक्त भूसंपादनाबाबतची सूचना एनएचएआयकडून प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे या महामार्गासाठी आणखी जमीन संपादीत केली जाणार आहे. तर दुसरीकडे आता एनएचएआयकडून या महामार्गाच्या बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. दिवाळीनंतर निविदा प्रसिद्ध करण्यात येण्याची शक्यता आहे. डिसेंबरअखेरपर्यंत निविदा प्रक्रिया अंतिम करून कंत्राट बहाल करण्यात येणार असून नवीन वर्षात महामार्गाच्या कामास सुरुवात करण्याचे एनएचएआयचे नियोजन आहे. हा महामार्ग आणि त्यानंतर पुढे चौक – शिवारे,पुणे महामार्ग सेवेत दाखल झाल्यास मुंबई – पुणे प्रवासासाठी आणखी एक महामार्ग उपलब्ध होईल. परिणामी, मुंबई – पुणे प्रवास अतिजलद होण्यास मदत होणार आहे.