मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक शुक्रवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी ठप्प झाली. कार्यालयात जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर पोहोचलेल्या प्रवाशांची तारांबळ उडाली. या गोंधळाचा फटका पनवेल, नेरूळ, वाशीमार्गे ठाणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या हजारो नोकरदारांना बसला. कार्यालय गाठण्यासाठी अनेकांना तारेवरची कसरत करावी लागली.एमएमआरडीएने ठाणे आणि ऐरोलीदरम्यान गर्डर उभारण्यासाठी ट्रान्स हार्बर मार्गावर गुरुवारी मध्यरात्री १ ते पहाटे ४ या वेळेत ब्लॉक घेतला होता. मात्र, त्या कामाचा परिणाम सकाळच्या वाहतुकीवर झाला आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने प्रवासी हैराण झाले.

ब्लॉक कालावधीत बसविण्यात आलेल्या ऐरोली पुलाचा गर्डर तिरका झाल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासून ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे पनवेलमार्गे ठाणे आणि वाशीमार्गे मुंबईला जाणाऱ्या हजारो प्रवाशांना फटका बसला. अनेक प्रवाशांना कार्यालयात पोहोचण्यास विलंब झाला. ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे अनेकांना ॲप आधारित टॅक्सीचा पर्याय स्वीकारून कार्यालय गाठावे लागले.

या गोंधळामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. ब्लॉक रात्री होता, पण त्याचा फटका आम्हा प्रवाशांना सकाळी बसतोय. रेल्वेने ही कामे वेळेत पूर्ण करावी, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले. दरम्यान, ट्रान्स हार्बर मार्गावरील वारंवार घेण्यात येणाऱ्या ब्लॉक्समुळे प्रवाशांमध्ये नाराजी वाढत आहे. ही विकासकामे गरजेची असली तरी त्याचा परिणाम प्रवाशांवर होऊ नये, अशी मागणी करण्यात येत आहे.

११:३० नंतर वाहतूक पूर्ववत

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एमएमआरडीएच्या कामामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर सकाळी ११:३० वाजता ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे पूर्ववत झाली आहे. ठाणे स्थानकावरून वाशी – नेरूळकडे पहिली ट्रेन रवाना झाली.

प्रवाशांची गर्दी

नवी मुंबईतील ऐरोली, घणसोली, रबाळे आणि तुर्भे रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. ऐनवेळी रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने नोकरदारांची कार्यालयात वेळेवर पोहोचण्यासाठी धावपळ सुरू झाली. रेल्वेगाड्या वेळेवर नसल्याने स्थानकाबाहेर असलेल्या रिक्षा थांब्यावरही गर्दी झाली होती.