मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलाचा तब्बल २१ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. मालमत्ता कर भरण्यासाठीची तारीख उलटून गेलेली असली तरी गेल्या अनेक वर्षांपासून विविध आस्थापनांकडे थकीत असलेला कर वसूल करण्यासाठी मुंबई महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्या अंतर्गत विद्यापीठाचा थकीत कर वसूल करण्यासाठी लवकरच एक बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली. मालमत्ता कर हा मुंबई महानगरपालिकेचा उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून विविध मोठमोठ्या आस्थापनांनी पालिकेचा कर थकवलेला आहे. विविध न्यायालयीन प्रकरणे, विविध आक्षेप यांमुळे मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कराची थकबाकी तब्बल २२ हजार कोटींच्या पुढे आहे. ही संचित थकबाकी वसूल करणे हे मुंबई महापालिकेपुढे मोठे आव्हान आहे. चालू आर्थिक वर्षासाठी मुंबई महानगरपालिकेने मालमत्ता करासाठी ५६०० कोटींचे उद्दीष्ट्य निश्चित केले आहे. नव्या वर्षासाठीची देयकेही निर्गमित करण्यात आली आहेत.
मुंबई महापालिका २००९ पर्यंत मूल्याधारित करप्रणालीच्या आधारावर मालमत्ता कर वसूल करीत होती. त्यानंतर २०१० पासून भांडवली मूल्याधारित करप्रणालीचा अवलंब करण्यात आला. या करप्रणालीविषयी मोठ्या मालमत्ताधारकांच्या विविध आक्षेप होते. त्यामुळे काही विकासक संघटनांनी न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन प्रकरणांमुळे मुंबईतील विविध मोठमोठ्या आस्थापनांचा मालमत्ता कर थकीत आहेत. ही संचित थकबाकी वसूल करण्यासाठी करनिर्धारण विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. संचित थकबाकी असलेल्या मालमत्ता कर धारकांची यादी तयार करण्यात आली असून त्यात थकबाकी आणि त्यावरील दंडासहीत थकबाकी याची आकडेवारी तयार करण्यात आली आहे. पालिकेच्या या आकडेवारीनुसार मुंबई विद्यापीठाचा तब्बल २१ कोटी १९लाखांचा मालमत्ता कर थकीत आहे. तर दंडासहीत ही रक्कर ४० कोटी आहे.
मुंबई महापालिकेने चालू आर्थिक वर्षासाठी मालमत्ता करामध्ये १५ टक्के करवाढ केली आहे. मात्र ही करवाढ करण्यापेक्षा करनिर्धारण व संकलन विभागाने आधी संचित थकबाकी वसूलीसाठी प्रयत्न करावे अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली होती. ४८१ मोठ्या थकबाकीदारांनी तब्बल १४ हजार कोटींचा कर थकवला आहे त्यांच्याकडून कर वसूली करावी अशी मागणी त्यांनी केली होती.
चौकट करवसुलीसाठी मुंबई विद्यापीठाला यापूर्वीच नोटीस दिली आहे. त्यांचे काही आक्षेप आहेत त्याबाबत लवकरच एकत्रित सभा आयोजित करून हे आक्षेप सोडवले जातील. कलिना संकुलात विद्यापीठाची मोठी जागा असून त्यात काही ठिकाणी मोकळी जागा आहे तर काही ठिकाणी बांधकामे आहेत. त्यानुसार कागदपत्रांची पडताळणी करून हे आक्षेप दूर केले जातील अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, मुंबई विद्यापीठाला आकारण्यात आलेल्या मालमत्ता करामध्ये काही सुधारणा असल्यामुळे यापूर्वीही विद्यापीठाने मुंबई महापालिकेसह बैठक घेतली असून पुढील कार्यवाही सुरू असल्याची प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.