मुंबई : मुंबई विद्यापीठ म्हणजे गोंधळ हे समीकरण बनले आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षेचा निकाल न मिळणे, निकालामध्ये गोंधळ, परीक्षेचे प्रवेशपत्र ऐनवेळी देणे अशा अनेक बाबी दरवर्षी घडतात. आता अर्ज नोंदणीसाठी मुदत जाहीर केल्यानंतर तब्बल चार दिवसांनी विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राची (सीडीओई – पूर्वीचे आयडॉल) पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला १४ जून २०२५ पासून सुरुवात करण्यात येणार असल्याचे मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष चार दिवस उलटल्यानंतर म्हणजे १७ जून रोजी सायंकाळी ५ वाजल्यानंतर नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली.

नोकरी करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीडीओई महत्त्वाचे ठरते. अनेक विद्यार्थी या केंद्राद्वारे आपली उच्च शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण करतात. सीडीओई केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १४ जूनपासून https://mucdoeadm.samarth.edu.in/ या संकेतस्थळावरून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केल्याचे मुंबई विद्यापीठाने जाहीर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नोंदणीसाठी संकेतस्थळाला भेट दिली असता, तांत्रिक कारणांमुळे नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली नसल्याचा संदेश त्यांना संकेतस्थळावर दाखविण्यात येत होता.

या संदर्भात विद्यार्थ्यांनी सीडीओईच्या कार्यालयात चौकशी केली असता विद्यार्थ्यांना समाधानकारक उत्तर दिले जात नव्हते. त्यामुळे नोकरी सांभाळून विद्यार्थी चार दिवसांपासून रोज सीडीओईच्या कार्यालयामध्ये हेलपाटे मारत होते. संकेतस्थळ सुरू होण्याबाबत समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर चार दिवसांनी १७ जून रोजी सायंकाळी ५ वाजता विद्यापीठाकडून संकेतस्थळ सुरू करण्यात आले, मात्र विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी त्रासाला सामोरे जावे लागले.

प्रवेश प्रक्रियेच्या अर्ज नोंदणीच्या प्रक्रियेतच गोंधळ घातला जात असताना पुढे सुविधा व्यवस्थित मिळतील का, असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करण्याबरोबरच शुल्क भरण्याची सुविधा, तसेच, यूजीसीचा डीईबी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यासाठी काही तांत्रिक बदल करणे अपेक्षित होते. हे बदल करण्याचे काम सुरू असल्याने विद्यार्थ्यांना नोंदणी करता येत नव्हती. मात्र आता हे काम पूर्ण झाले असून, विद्यार्थांना कोणत्याही तांत्रिक अडचणीला सामोरे जावे लागणार नाही. तसेच, यूजीसी डीईबीच्या अभ्यासक्रमांची माहितीही त्यांना सहज उपलब्ध होईल, असे सीडीओईचे संचालक शिवाजी सरगर यांनी सांगितले.