Mumbai Local Train Accident: मुंबई लोकल ही जशी शहराची लाईफलाईन आहे, तशीच ती मृत्यूचा सापळादेखील आहे. लोकलमधून पडून, लोकलचा धक्का लागून, चेंगराचेंगरी, प्रवाशांची मारहाण, चोरांचा हल्ला अशा अनेक कारणामुळे मुंबईकर लोकलमध्ये जीव गमावत असतात. आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकलमधील गर्दीमुळे एका ३१ वर्षीय जवानाचा खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपली ड्युटी संपवून घरी जाणाऱ्या या जवानाचा गणवेशात असतानाच मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी मीरा रोड आणि भायंदर स्थानकादरम्यान झालेल्या एका दुर्दैवी अपघातात महाराष्ट्र सुरक्षा दलातील (MSF) जवान गणेश जगदाळे (वय ३१) यांचा मृत्यू झाला. गणेश जगदाळे हे दहिसर स्थानकातून नायगावकडे जाणाऱ्या विरार लोकल ट्रेनने प्रवास करत होते.
अपघात कसा झाला?
नेहमीप्रमाणे विरार ट्रेनमध्ये अत्यंत गर्दी असल्याने झालेल्या धक्काबुक्कीमध्ये दरवाजातून त्यांचा तोल गेला आणि ते चालत्या ट्रेनमधून खाली पडले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत जवान गणेश जगदाळे हे दहिसर सिटी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
गणवेश आणि ओळखपत्रावरून जवान गणेश जगदाळे यांची ओळख पटली. रेल्वे पोलिसांनी त्यांना कांदिवली येथील मुंबई महानगरपालिकेच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
२० वर्षांत ५१,००० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू
दरम्यान गेल्या २० वर्षांत मुंबईत लोकल रेल्वे गाड्यांमध्ये ५१,००० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, असे पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेने ऑगस्ट २०२४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. यामध्ये पश्चिम रेल्वे मार्गांवरील लोकल गाड्यांच्या अपघातांमध्ये २२,४८१ प्रवाशांचा, तर मध्य रेल्वे मार्गांवरील लोकल गाड्यांच्या अपघातांमध्ये २९,३२१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
सरकारी आकडेवारीनुसार मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर दररोज सरासरी सात मृत्यू होतात. बहुतेक मृत्यू रुळ ओलांडल्याने आणि धावत्या गाड्यांमधून पडल्याने झाले आहेत. या आकडेवारीनंतर रेल्वे गाड्या आणि प्लॅटफॉर्म व ट्रॅक दरम्यान संरक्षण भिंती बांधणे यासह आणखी सुरक्षा उपाययोजना वाढवण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र, तरीही याबाबत ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत.