मुंबई : वांद्रे – वरळी सागरी सेतूजवळ भरधाव वागात धावणाऱ्या एका वाहनाने दिलेल्या धडकेत ५० वर्षीय महिला पादचाऱ्याचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी रात्री घडला. उपचारादरम्यान सोमवारी महिलेचा मृत्यू झाला. पोलीस शिपाई अमोल नवदकर (३५) रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास गस्त घालत असताना त्यांना नियंत्रण कक्षातून वांद्रे – वरळी सागली सेतूजवळील रेक्लेमेशन परिसरात अपघात झाल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यावर साधारण ५० वर्षांची महिला गंभीर जखमी अवस्थेत आढळली.
एका वाहनाने दिलेल्या धडकेत ही महिला जखमी झाल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. नवदकर यांनी या महिलेला उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल केले. सोमवारी सकाळी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेचा रस्ता ओलांडताना अपघात झाला. या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठे यांनी दिली.
वाहन चालक गुरविंदर सिंग कुलबीर सिंग किर (४८) सोमवारी सकाळी वांद्रे पोलीस ठाण्यात हजर झाला. कीर सांताक्रूझ येथील दौलतनगरमधील रहिवासी असून त्याचा दगड क्रशिंग प्लान्ट आहे. तो दक्षिण मुंबईतून परतत होता. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी होती आणि त्यामुळे रस्ता ओलांडणारी महिला दिसली नाही, असे त्याने पोलिसांना सांगितले.या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी वाहनचलाक किर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१) (निष्काळजीपणामुळे मृत्यू), तसेच मोटार वाहन कायद्यातील विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला नोटीस दिली.