मुंबई : ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी बीडीडी वसाहतीमधील प्रत्येक चाळीत दरवर्षी मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी केली जाते. संपूर्ण चाळीला रोषणाई केली जाते. कंदिलाने सजवले जाते. तर प्रत्येक मजल्यावरील घराबाहेर सुरेख रांगोळी असते. संपूर्ण चाळकरी एकत्र येत दिवाळी साजरी करतात, फटाके फोडतात. मात्र आता चाळीतील अशीही दिवाळी काही रहिवाशांना संक्रमण शिबिरात साजरी करावी लागत आहे. तर काही रहिवाशांची दिवाळी हक्काच्या ४० मजली उत्तुंग इमारतीतील ५०० चौ. फुटाच्या घरात साजरी होत आहे. टाॅवरमधील ही पहिली दिवाळी रहिवाशांकडून उत्साहात साजरी होत असली तरी चाळीतील दिवाळीच्या आठवणी सगळ्यांच्या मनात कायम आहेत.
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे. त्यासाठी तिन्ही ठिकाणच्या मोठ्या संख्येने चाळी पाडण्यात आल्या आहेत. पाडण्यात आलेल्या चाळीतील रहिवाशी संक्रमण शिबिरात आहेत. तर ज्या चाळी पुढील टप्प्यात पाडल्या जाणार आहेत, त्या चाळीतील रहिवासी चाळीतील शेवटची दिवाळी मानून मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करीत आहेत. वरळी बीडीडी चाळीतील दोन पुनर्वसित इमारतींतील ५५६ घरांचा ताबा ऑगस्टमध्ये रहिवाशांना देण्यात आला. काही रहिवासी येथे राहायला आले असून काहींच्या घरातील अंतर्गत सजावटीची कामे सध्या सुरू आहेत. हे रहिवासी लवकरच टाॅवरमध्ये रहायला येणार आहेत.
सध्या ते संक्रमण शिबिरातच दिवाळी साजरी करीत आहेत. जे रहिवाशी ४० मजली टाॅवरमधील ५०० चौरस फुटांच्या घरात रहाण्यास आले आहेत, त्यांची टाॅवरमधील ही पहिली दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. चाळीप्रमाणेच संपूर्ण इमारतीला रोषणाई करण्यात आली आहे. दाराबाहेर रांगोळी काढण्यात आली आहे. चाळीप्रमाणेच इथेही दिवाळी साजरी केली जात असल्याची माहिती रहिवाशी सुष्मिता खोपकर यांनी दिली. चाळीतील दिवाळी वेगळीच होती, त्या दिवाळीची आठवण येते आणि ती कायम मनात असणार आहे. पण छोट्या घरातून आम्ही आता मोठ्या ५०० चौरस फुटांच्या घरात राहायला आलो आहोत. आता आम्हाला सर्व चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत याचा आनंद मोठा आहे. त्यामुळे टाॅवरमध्येही आम्ही पहिली दिवाळी उत्साहात साजरी करत असल्याचे सुरेश खोपकर यांनी सांगितले.
चाळीत प्रत्येक जण शेजाऱ्याकडे फराळ तयार करण्यासाठी जात होता. चाळीतील प्रत्येक घरात फराळाच्या पंगतीत बसण्याची मजा काही औरच होती. एकूणच चाळीतील दिवाळी प्रत्येकाच्या मनात रुंजी घालत आहे. पुनर्वसित इमारतीतील घरांचा ताबा सोडत पद्धतीने देण्यात आला आहे, त्यामुळे चाळीतील रहिवासी दोन इमारतीत विखुरले आहेत. मात्र तरीही यंदा आम्ही जमेल तसे एकत्र येऊन इमारतीखाली रांगोळी काढली, फटाके फोडले, असे शितल भोसले यांनी सांगितले.
आमची नव्या घरातील ही पहिलीच दिवाळी असून त्याचा आनंद मोठा असल्याचेही शितल भोसले यांनी सांगितले. मात्र त्याचवेळी टाॅवरमध्ये यंदा पहिली दिवाळी साजरी करता आली नसल्याची खंत काही रहिवाशांनी व्यक्त केली. काही रहिवाशांच्या टाॅवरमधील घरातील अंतर्गत सजावटीचे काम पूर्ण न झाल्याने त्यांना संक्रमण शिबिरातच दिवाळी साजरी करावी लागत आहे. यातीलच एक रहिवासी म्हणजे भूषण शेट्ये. यंदा टाॅवरमध्ये दिवाळी साजरी करता आली नाही, पण पुढील दिवाळी टाॅवरमधील घरात मोठ्या उत्साहात साजरी करू, असे त्यांनी सांगितले. जे रहिवासी पुनर्वसित इमारतीत राहावयास आले आहेत, ते उत्साहात दिवाळी साजरी करीत आहेत. त्यांना चाळीतील दिवाळीची आठवण येत आहे, मात्र मोठ्या आणि सुविधांयुक्त घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने ते आनंदी आहेत.