मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील ‘सहायक आयुक्त’ संवर्गातील रिक्त पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेअंती शिफारस केलेल्या चार सहायक आयुक्तांच्या पदस्थापनेचे आदेश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या आदेशान्वये शुक्रवारी जारी करण्यात आले. त्यानुसार, नितीन शुक्ला, संजय इंगळे, अलका ससाणे, महेश पाटील या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. तसेच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस करण्यात आलेल्या चार नवीन सहाय्यक आयुक्तांचीही नियुक्ती करण्यात आली आहेत.
प्रशासकीय मंजुरीनुसार, नितीन शुक्ला यांच्याकडून बी विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदाची जबाबदारी काढून त्यांच्याकडे आता के पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदाचा कारभार सोपवण्यात आला आहे. पूर्वी ते बी विभागाचे सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर के पूर्व विभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागत होता. संजय इंगळे यांची बदली नगर अभियंता विभागात करण्यात आली आहे. पूर्वी त्यांच्याकडे सी विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदाची जबाबदारी होती. महेश पाटील यांची एस विभागाच्या सहाय्यक पदावर बदली करण्यात आली असून पूर्वी त्यांच्याकडे एफ दक्षिण विभागाची जबाबदारी होती. तसेच, अलका ससाणे यांची सहायक आयुक्त, बाजार विभागात बदली करण्यात आली आहे. पूर्वी त्या एस विभागात कार्यरत होत्या. मनीष साळवे यांच्याकडून आर दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदाची जबाबदारी काढून त्यांना नगर अभियंता विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दरम्यान, महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्त संवर्गात एकूण १४ उमेदवारांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस करण्यात आली होती. त्यापैकी सहा उमेदवारांची यापूर्वीच सहाय्यक आयुक्त पदावर पदस्थापना करण्यात आली आहे. तर शुक्रवारी आणखी चार सहायक आयुक्तांना पदस्थापना देण्यात आली. उर्वरित ४ पैकी एक उमेदवार पूर्वीच्या कार्यसंस्थेकडून अद्याप कार्यमुक्त झालेले नाहीत. तर एक उमेदवार प्रसूती रजेवर असून अन्य दोन उमेदवार सद्यस्थितीत विभाग संलग्नता प्रशिक्षण घेत आहेत. विभाग संलग्नता प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची सहायक आयुक्त पदावर पदस्थापना करण्यात येईल. सहाय्यक आयुक्त हे महत्त्वाचे पद दीर्घकाळ रिक्त ठेवणे संयुक्तिक नसल्याने सद्यस्थितीत रिक्त असलेल्या सहायक आयुक्त पदाचा कार्यभार प्रशासकीय निकड व निर्णयानुसार उपप्रमुख अभियंता कार्यकारी अभियंता संवर्गातील अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शिफारशीनुसार चार नवे सहाय्यक आयुक्त
१) संतोष गोरख साळुंके – सहायक आयुक्त, सी विभाग
२) वृषाली पांडुरंग इंगुले – सहायक आयुक्त, एफ दक्षिण विभाग
३) योगेश रंजीतराव देसाई – सहायक आयुक्त, बी विभाग
४) आरती भगवान गोळेकर – सहायक आयुक्त, आर दक्षिण विभाग