मुंबई : नद्या, नाले स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनातील प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून मुंबईतील नद्या आणि नाले स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच अशा प्रकारच्या प्रयत्नातून वाकोला नाला स्वच्छ करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवणार आहे. नंतर त्याची व्यापक अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती उप आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

महानगरपालिका ‘एच पूर्व’ विभाग, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया (डब्ल्यूआरआय) आणि घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत विविध स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुंबईतील घनकचरा व्यवस्थापनाच्या समुदाय सहभागासाठी वाटचाल’ या विषयावर परिमंडळनिहाय भागधारकांची कार्यशाळा वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये बुधवारी पार पडली. त्यावेळी दिघावकर बोलत होते. मुंबई महानगर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. त्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांसोबतच नागरिकांचाही सहभाग आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. नागरिकांनी कचरा वर्गीकरण करावे, नद्या आणि नाल्यांमध्ये कचरा न टाकता तो कुंड्यांमध्येच टाकावा, त्यामुळे मुंबईतील नद्या आणि नाले स्वच्छ राहतील, असेही त्यांनी नमूद केले.

कचरा उगमस्थळीच रोखण्यासाठी उपाययोजना

या कार्यशाळेत कचऱ्याचे वर्गीकरण आणि त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती, मिठी नदी, वाकोला नाला कचरामुक्त करणे आदी विषयांवर या कार्यशाळेत विचारमंथन झाले. यापूर्वी महानगरपालिकेतर्फे समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता आणि प्लास्टिक विभाजनासारखे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. अशाच प्रकारचा उपक्रम वाकोला आणि मिठी नदी स्वच्छ करण्यासाठी राबविण्यात येणार आहे. जेथे कचरा निर्माण होतो, त्याच ठिकाणी म्हणजे उगमस्थळीच तो रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी लवकरच कृती आराखडा तयार करण्यात येईल, असे परिमंडळ ३ चे उप आयुक्त विश्वास मोटे यांनी सांगितले.

एच पूर्व विभागामध्ये दररोज ३०० टन कचरा संकलन

दाटवस्थीच्या क्षेत्रांमध्ये मोकळ्या जागेवर कचरा टाकण्याची समस्या अधिक आढळून येते. मिठी नदी आणि वाकोला नाल्यांसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. एच पूर्व विभागामध्ये दररोज ३०० टन कचरा संकलित होतो. नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपययोजना करणे महत्त्वाचे आहे. कचरा वर्गीकरणाची जनजागृती होण्यासाठी एक दिवस सुका कचरा, एक दिवस ओला कचरा, एक दिवस इलेक्ट्रिक कचरा याप्रमाणे कचऱ्याचे दिवस नेमून देणे आवश्यक आहे, असे मत एच पूर्व’ विभागाच्या सहायक आयुक्त मृदृला अंडे यांनी व्यक्त केले.

या कार्यशाळेत एच पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त दिनेश पल्लेवाड, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (मुंबई) घनकचरा व्यवस्थापन आणि संशोधन केंद्राच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. स्नेहा पळणीटकर, स्त्रीमुक्ती संघटनेच्या ज्योती म्हापसेकर, टाटा समाजविज्ञान संस्थेच्या अमिता भिडे यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी अत्याधुनिक प्रकल्प उभारणे गरजेचे

कचऱ्याचे वर्गीकरण, कचरा पेटीतच कचरा टाकणे, गृहसंकुलातील कचरा महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कचरा संकलन डब्यांमध्ये टाकणे यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्याची चर्चा कार्यशाळेत झाली. बदलत्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करून पर्यावरण संतुलन राखणे आवश्यक आहे. यासाठी घनकचरा व्यवस्थापन तेवढेच महत्वाचे आहे. या बाबींसाठी माहिती संकलन, मॅपिंग, जास्त कचरा निर्माण होणारी ठिकाणे निश्चित करणे, तंत्रज्ञानाचा वापर (सेन्सर, ड्रोन, मोबाइल ॲप्स), कचऱ्यावर प्रक्रिया करणारे अत्याधुनिक प्रकल्प उभारणे यासह विविध बाबी आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी कार्यशाळेत नमूद केले.