“अपक्षांची मतं गृहीत धरली जाणार नाही, कारण..”; शिंदे गटाच्या दाव्यावर विधानसभा उपाध्यक्षांचं मोठं वक्तव्य

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि समर्थकांनी नवा गट स्थापन करण्याबाबत पाठिंबा असलेल्या आमदारांचं पत्र पाठवलं आहे.

“अपक्षांची मतं गृहीत धरली जाणार नाही, कारण..”; शिंदे गटाच्या दाव्यावर विधानसभा उपाध्यक्षांचं मोठं वक्तव्य
नरहरी झिरवळ व बच्चू कडू (संपादित छायाचित्र)

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि समर्थकांनी नवा गट स्थापन करण्याबाबत पाठिंबा असलेल्या आमदारांचं पत्र पाठवलं आहे. यावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “शिंदे गटाने पाठवलेल्या पत्रात काही अपक्ष आमदारांची नावंही आहेत. त्यामुळे अपक्ष आमदारांना तो अधिकार आहे की नाही हे तपासलं जाईल,” असं मत नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केलं. तसेच अपक्ष आमदारांची मतं गृहीत धरली जाणार नाही, असंही स्पष्ट केलं. ते गुरुवारी (२३ जून) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

नरहरी झिरवळ पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना गटनेतेपदी अजय चौधरी यांचं पत्र दिलं. ते मी स्विकारलं आहे. माझ्याकडे सुनिल प्रभु प्रतोद आहे हेच पत्र आलंय. त्या दिवशी देण्यात आलेल्या पत्रावर सुनिल प्रभु यांनी प्रतोद म्हणून सही केली आहे. माझ्याकडे एकनाथ शिंदे गटाकडून त्यांच्याकडे २/३ बहुमत असल्याचं कोणतंही पत्र आलेलं नाही. दावा करणं हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे.”

“अपक्षांची मतं गृहीत धरली जाणार नाही”

“विशिष्ट गट स्थापन करण्याचं जे पत्र माझ्याकडे आलं आहे त्यावर ३०-३२ आमदारांच्या सह्या आहेत त्यातही संशय आहे. आमदार नितीन देशमुख यांनी ते इंग्रजी स्वाक्षरी करतात आणि पत्रावर त्यांच्या नावासमोर मराठीत स्वाक्षरी आहे असं म्हटलं आहे. त्यामुळे त्यावर तपासणी करावी लागेल. त्यावर अपक्ष आमदारांच्या सह्या असतील तर त्यांना त्याबाबत अधिकार आहे का याचाही विचार करावा लागेल. शिवसेना पक्ष म्हणून अपक्षांची मतं त्यात गृहीत धरली जाणार नाही,”

“शिंदे गटाच्या पत्रावरील आमदार देशमुखांच्या सहीवर प्रश्नचिन्ह”

नरहरी झिरवळ म्हणाले, “शिवसेना आमदार नितीन देशमुखांनी ते सुरतला होते असं सांगितलं, पण आता ते त्यांच्या गावी आहेत. त्यांनी मी इंग्रजी सही करतो मात्र पत्रावरील सही मराठी आहे. त्यामुळे माझी स्वाक्षरी गृहीत धरू नये असं प्रश्नांकीत केलंय. मी ते तपासून घेईल आणि माझी खात्री झाली की विचार करेन.”

हेही वाचा : Maharashtra Political Crisis Live : अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचा देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश; वाचा प्रत्येक अपडेट…

“कायद्यात पक्षप्रमुखाने गटनेता निवडायचा असतो”

“कायद्यात पक्षप्रमुखाने गटनेता निवडायचा असतो आणि गटनेत्याने प्रतोद निवडायचा असतो. याप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधी एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदी निवडलं होतं, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजय चौधरी यांना गटनेतेपदी नियुक्तीचं पत्र दिलं,” अशी माहिती नरहरी झिरवळ यांनी दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्तलिखित साहित्याच्या संवर्धनासाठी काय करता आहात?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी