मुंबई: मुलांच्या आरोग्याचे संवर्धन आणि विकास साधण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा’च्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत ७,१७३ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया तर ६३,०७० बालकांवर अन्य शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. दरवर्षी राज्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील सुमारे दोन कोटी बालकांची दोन वेळा आरोग्य तपासणी करण्यात येते. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत ० ते १८ वर्ष वयोगटातील मुलांची तपासणी करुन मुलांमध्ये आढळणारे जन्मत: असलेले व्यंग, लहान मुलांमधील आजार, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार व अपंगत्व इत्यादी बाबींचे वेळेवर निदान करुन त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याचे तसेच बालकांची आरोग्याची तपासणी व त्यांच्यात आढळणाऱ्या आजारांना वेळीच पायबंध घालणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाचा फायदा राज्यातील ० ते १८ वर्ष वयोगटातील जवळपास दोन कोटी मुलांना दरवर्षी होत आहे. या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी स्तरावर ० ते ६ वर्ष वयोगटातील मुलांची वर्षातून दोन वेळेस आरोग्य तपासणी करण्यात येते. या व्यतिरिक्त शासकीय व निमशासकीय शाळेतील ६ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांनाही या आरोग्य तपासणी कार्यक्रमाचा लाभ होत आहे. या आरोग्य तपासणी दरम्यान मुलांमध्ये आढळून आलेल्या आरोग्य विषयक समस्या, अडचणीसाठी योग्य त्या संदर्भ सेवा व सर्व प्रकारचे वैद्यकीय व शल्य चिकित्सक उपचार मोफत पुरविण्यात येतात.

हेही वाचा : अपंगासाठीचे सल्लागार मंडळ अद्यापही कार्यान्वित नाही, राज्य सरकारच्या उदासीन भूमिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

अंगणवाडी स्तरावर एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत दोन वेळा ० ते ६ वर्षे वयोगटातील मुलांची तपासणी करण्यात आली असून, पहिल्या फेरीत ६३,४५,०४७ तर दुसऱ्या फेरीत ६७,४०,०७१ मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. शाळा स्तरावर याच कालावधीत १,२२,०६,६२७ मुलांची तपासणी करण्यात आली असून, ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया, तर ३२,८०१ मुलांवर इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या कालावधीत दोन वेळा ० ते ६ वर्षे वयोगटातील २,२९,०६७ बालकांना तर ६ ते १८ वर्षे वयोगटातील ५,०९,८३५ मुलांना संदर्भ सेवा देण्यात आली आहे.

या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी स्तरावर एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत दोन वेळा ० ते ६ वर्षे वयोगटातील मुलांची तपासणी करण्यात आली असून, पहिल्या फेरीत ६७,०४,२५५ तर दुसऱ्या फेरीत ६९,७३,४१६ मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. शाळा स्तरावर याच कालावधीत १,२२,०३,८०८ मुलांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ३,८३९ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया, तर ३०,२६९ मुलांवर इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या कालावधीत दोन वेळा ० ते ६ वर्षे वयोगटातील २,००,५४३ बालकांना तर ६ ते १८ वर्षे वयोगटातील ४,२४,१८२ मुलांना संदर्भ सेवा देण्यात आली आहे.

हेही वाचा : केईएम, कूपर, नायरमध्ये रुग्णसेवा कोलमडणार, ‘मार्ड’च्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा

राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम १ एप्रिल २०१३ पासून लागू करण्यात आला आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाची पथके प्रत्येक तालुक्यात नियुक्त करण्यात आलेली असून, या पथकाचे मुख्यालय, ग्रामीण रुग्णालये किंवा उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आहे. प्रत्येक पथकात एक वाहन, दोन वैद्यकीय अधिकारी, एक औषधी निर्माण अधिकारी, एक एएनएम, तपासणी साहित्य, इत्यादी पुरविण्यात आलेले आहे. आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे गावनिहाय वेळापत्रक शिक्षण आणि महिला व बाल कल्याण विभागांच्या समन्वयाने तयार करुन प्रत्येक पथकास ठराविक वेळापत्रकाप्रमाणे तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सहाय्यक संचालक डॉ संतोष माने यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National child health programme 7173 children underwent heart surgery in maharashtra mumbai print news css