मुंबई : अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील प्रमुख सूत्रधाराला मलेशियात पकडून भारतात आणण्यात अमली पदार्थ नियंत्रण विभागाला(एनसीबी) यश मिळाले आहे. मलेशिया तसेच इतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने ही कारवाई पार पडली. नवीन गुरूनाथ चिचकर असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली होती. जानेवारी महिन्यात कोकेन तस्करीप्रकरणी दाखल गुन्ह्यांचा त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे.
मुंबईत कुरियर कंपनीद्वारे ऑस्ट्रेलियातून पार्सल आले होते. त्यात प्रोजेक्टर असल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले होते. पण प्रत्यक्ष तपासणीत त्यातील प्रोजेक्टरमध्ये २०० ग्रॅम कोकेन लपवण्यात आल्याचे एनसीबीच्या कारवाईत स्पष्ट झाले. एनसीबीने ते कोकेन जप्त केले. परदेशातून कुरियरद्वारे येणाऱ्या अमलीपदार्थांच्या जाळ्याचा शेवटपर्यंत माग घेण्याचा निर्णय एनसीबीने घेतला. त्यानुसार या कारवाईत नवी मुंबईतील एका संशयीताला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या घरातून ११ किलो ५४० ग्रॅम कोकेन, चार किलो ९०० ग्रॅम गांजा आणि साडे पाच किलो गांजा गमीज् जप्त करण्यात आले होते.
या संपूर्ण प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेले कोकेन अमेरिकेवरून भारतात आल्याचे एनसीबीला आरोपींच्या चौकशीत समजले. या टोळीचे काही सदस्य भारतात सक्रीय असून ते अमलीपदार्थांचे इतरत्र वितरण करत होते. त्यात क्लिअरिंग हाऊस दलाल व हवाला ऑपरेटरचाही समावेश होता.या माहितीनंतर एनसीबीने विविध कारवायांमध्ये आतापर्यंत ८ जणांना अटक केली.
पण याप्रकरणातील मुख्य सूत्रधार २०२१ पासून पासून थायलंडमध्ये लपून बसला होता. त्याच्यावर एलएसडी तस्करीप्रकरणी एनसीबीने यापूर्वी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे त्याच्याविरोधात एनसीबीने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्या नोटीसच्या आधारावर तो मलेशियात सापडला आणि त्याला भारतात आणण्यात आले. संबंधीत टोळी गेल्या एका वर्षांपासून कार्यरत होती. त्यांनी परदेशातून अनेकवेळा भारतात अमलीपदार्थांची तस्करी केल्याचे प्राथमिक तपासात एनसीबीला समजले आहे. त्याची पडताळणी सुरू आहे. त्याच्या अटकेमुळे अमेरिकेतून अमली पदार्थ पाठवणाऱ्यांची माहिती मिळू शकेल. याप्रकरणी आरोपीच्या मालमत्ता व आर्थिक व्यवहारांची माहिती घेतली असता थायलंडमध्ये मालमत्ता व बँक खाती सापडली आहे. त्यांच्यावर जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीच्या चौकशीनंतर आणखी महत्त्वाची माहिती मिळणार असल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. याआधी मे महिन्यात, एनसीबीने युनाटेड अरब अमिराती(युएई) येथून एका आरोपीला पकडून भारतात आणले होते. बंगळुरू येथील अमलीपदार्थ तस्करी प्रकरणात त्याचा सहभाग होता.