विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेली घसरण अद्यापही कायम असल्याने आगामी दीड-दोन वर्षांमध्ये पक्ष नव्याने उभा करण्यासाठी कोणते उपाय योजता येतील याबाबत सोमवारपासून दोन दिवस विचारमंथन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रायगड जिल्ह्य़ातील कर्जतमध्ये करण्यात येणार आहे.

पक्षाच्या स्थापनेपासून सतत १५ वर्षे सत्तेत राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची २०१४ च्या निवडणुकीपासून घसरण सुरू झाली. महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिकांमध्येही पक्षाला मर्यादितच यश मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस चौथ्या क्रमांकावर मागे पडला. पश्चिम महाराष्ट्र या पक्षाच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात भाजपने मुसंडी मारली. सहकार चळवळ हे राष्ट्रवादीचे बलस्थान, पण या बलस्थानावरच भाजपने कुरघोडी केली.गेल्या वर्षभरात झालेल्या विविध निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळू शकलेले नाही. गणेश नाईक यांच्यामुळे नवी मुंबईची महानगरपालिका पक्षाने जिंकली. हा अपवाद वगळता पुणे, पिंपरी-चिंचवड या बालेकिल्ल्यातील महानगरपालिका गमवाव्या लागल्या. अलीकडेच परभणी महानगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादीच्या हातातून गेली. मीरा-भाईंदरमध्ये पक्ष पूर्णपणे नामशेष झाला. जिल्हा परिषदांमध्येही फक्त पाच जिल्ह्य़ांमध्येच पक्षाची सत्ता आली. एकूणच गेल्या तीन वर्षांत राष्ट्रवादीची अधोगतीच झाली आहे.

आंदोलनाची रूपरेषा ठरणार

या साऱ्या पाश्र्वभूमीवर आगामी निवडणुकीत पक्षाला पुन्हा उभारी देण्याकरिता पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस रायगड जिल्ह्य़ातील कर्जतमध्ये पक्षाच्या निवडक नेत्यांचे विचारमंथन होणार आहे. पक्षाचे आजी-माजी खासदार-आमदार, माजी मंत्री, शहर व जिल्हाध्यक्ष अशा ३००च्या आसपास नेत्यांना या बैठकीकरिता निमंत्रित करण्यात आले आहे. पुढील वर्षभरातील कार्यक्रम तसेच आगामी तीन महिन्यांमध्ये हाती घ्यायची आंदोलने याची रूपरेषा निश्चित केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.