पराभवास मीच जबाबदार असल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पराभवाबद्दल कोणाला दोष दिला नसला तरी राणे यांच्या पुत्राने या पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडले आहे. त्यातच ‘राणे जिंकले, काँग्रेस हरली’, अशी भूमिका राणे यांच्या मालकीच्या वृत्तपत्राने मांडली आहे.
आपल्या समर्थकांच्या पराभवानंतर राणे यांनी पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडले होते. एकदा तर त्यांनी काँग्रेसचा पराभव काँग्रेसनेच केल्याची टीका केली होती. राणे यांनी स्वपक्षीयांवर खापर फोडल्याने यापूर्वी त्यांना पक्षाच्या नेत्यांची नाराजी ओढावून घ्यावी लागली होती. कुडाळ व आता वांद्रे पूर्व मतदारसंघातील पराभवाचे खापर कोणावरही न फोडता या पराभवांची जबाबदारी राणे यांनी स्वत:वर घेतली. राणे यांच्या भूमिकेबद्दल काँग्रेस नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. पण पराभवाला २४ तास उलटण्याच्या आतच राणे यांच्या पुत्राने काँग्रेसवर पराभवाचे खापर फोडले.
मुंबईत काँग्रेसची तळागाळापर्यंत संघटनाच अस्तित्वात नसल्याची टीका राणे यांचे आमदार पुत्रे नीतेश राणे यांनी केली. वांद्रे पूर्व मतदारसंघात काँग्रेसची यंत्रणाच नव्हती. शिवसेनेचे गटप्रमुख स्थानिकांच्या संपर्कात असतात. काँग्रेसमध्ये मात्र तशा यंत्रणेचा अभाव असल्याचा आरोप राणे यांनी
केला.  राणे यांच्या मालकीच्या वृत्तपत्रात पराभवाबद्दल काँग्रेसलाच जबाबदार धरण्यात आले आहे.  राणे यांच्यासाठी आपण आपल्या मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा देऊन वडिलांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव मांडला होता, अशी माहिती नितेश राणे यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एमआयएमचे आव्हान
वांद्रे पूर्व मतदारसंघात प्रचार करताना मुस्लिम तरुणांना अमली पदार्थाचे व्यसन लावण्याचा उद्योग एमआयएमकडून केला जात असल्याचा आरोप नीतेश राणे यांनी केला. या आरोपाचा एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी इन्कार केला. राणे यांनी पुरावे द्यावे, असे आव्हान पठाण यांनी दिले आहे.

काँग्रेसची चिंता वाढली
वांद्रे पूर्व मतदारसंघात नारायण राणे यांच्या पराभवाने पुढील आठवडय़ात होणाऱ्या नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची चिंता वाढली आहे. मतदार अजूनही काँग्रेसच्या विरोधात असल्याने ही परिस्थिती बदलायची कशी, असा प्रश्न पक्षाच्या नेत्यांना पडला आहे. जनतेमध्ये केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात नापसंतीची भावना वाढीस लागली असली तरी अजूनही सरकार नवीन आहे. त्यांना काम करण्याची संधी दिली पाहिजे, ही लोकांची भावना आहे. यामुळेच त्याचा काँग्रेसला फायदा होत नाही, असे मत काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी व्यक्त केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitesh blame congress leaders for rane defeat