मुंबई : मुंबईमध्ये पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने वॉटर मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा असून या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करावे. त्यासाठी वॉटर मेट्रोचा आराखडा तीन महिन्यांत सादर करावा, अशा सूचना मत्सव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी येथे दिल्या.
मुंबईमध्ये वॉटर मेट्रो सुरू करण्यासाठी पाहणी करण्याचे काम कोची मेट्रो रेल लि. कंपनीस देण्यात आले होते. त्यांच्या अहवालाचे सादरीकरण राणे यांच्या दालनात करण्यात आले. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये यांच्यासह कोची मेट्रो रेल कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
मुंबईमध्ये जल वाहतुकीसाठी मोठ्या संधी असल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले की, विशेषत: बांद्रा, वरळी, वर्सोवा, दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईमध्ये जल वाहतुकीच्या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. जास्तीत जास्त प्रवासी असणाऱ्या आणि फायद्याच्या मार्गांची निवड करण्यात यावी. वॉटर मेट्रोच्या तिकीटांचे दर ठरविताना ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात असतील असे पहावे. उत्तर मुंबईतून दक्षिण मुंबईमध्ये आणि नवी मुंबईतून दक्षिण मुंबईमध्ये येण्यासाठी वॉटर मेट्रो हा एक चांगला पर्याय ठरणार आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करुन विकास आराखडा तयार करावा. तसेच जेटी आणि मेट्रो टर्मिनलचा मेट्रोच्या धर्तीवर विकास करण्यात यावा. तसेच त्यांना वाहतुकीच्या इतर मार्गांनी जोडण्याची कार्यवाही करावी, अशा सूचनाही मंत्री राणे यांनी यावेळी दिल्या.
● मुंबई वॉटर मेट्रोसाठी एकूण २९ टर्मिनल उभारण्यात येणार असून दहा मार्गांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये वाढ करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
● जेटी टर्मिनलवर प्रवाशांसाठी सुविधा उभारणे, बोट खरेदी, इतर सुविधा यांचा अंतर्भाव या प्रकल्पामध्ये असणार आहे. ● प्रकल्पासाठी एकूण अडीच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वॉटर मेट्रोमुळे मुंबईतील प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे