मुंबई : ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या पावसाचा फटका मुंबईतील खुल्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या शाही विवाह सोहळ्यांना बसला आहे. यामुळे काही विविह सोहळे पुढे ढकलण्यात आले, तर काहींनी बंदिस्त सभागृहात विवाह सोहळा पार पाडला. विवाह सोहळ्याच्या वेळी पडलेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले.

मुंबईतील विविध मैदानात शाही विवाह सोहळे होत असतात. महालक्ष्मी येथील रेसकोर्स, मरीन ड्राईव्ह येथील इस्लाम जिमखाना, पारसी जिमखाना, ग्रॅंट मेडिकल कॉलेज मैदान (जीएमएस), वरळी येथील एनआयएससी क्लब, पारसी बे व्हूय (भाऊचा धक्का), जिओ, एमएमआरडीए मैदान, जुहू, लोखंडवाला, महालक्ष्मी येथील रेसकोर्समध्ये फर्स्ट एनक्लोजर, सेकंड एकन्कोलजर, मिनी क्लब, मेंबर एनक्लोजर आदी ठिकाणी शाही विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात येते.

दिवाळी संपल्यावर लग्नसराई सुरू झाली. प्रत्येक शाही विवाह सोहळ्यांसाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येतात. एका विवाह सोहळ्यासाठी किमान २ ते ३ कोटी रुपये खर्च येतो. काही वेळा ५ कोटी वा त्यापेक्षा अधिक खर्च येतो. कधी एकाच इव्हेंट कंपनीला कंत्राट दिले जाते, तर कधी वेगवेगळ्या कॅटरर्स, मंडप सजावट करणाऱ्यांना स्वतंत्र ना काम दिले जाते.

यंदा ऑक्टोबरमध्ये पाऊस पडल्याने या शाही विवाह सोहळ्यांना मोठा फटका बसला. अनेक शाही विवाह सोहळे रद्द करण्यात आले. अनेकांनी मैदानातील सोहळा रद्द करून लहान सभागृहात समारंभ आयोजित केला. त्याचा फटका कॅटरिंग, सजावट करणारे, इव्हेंट कंपन्या आदींना बसला. अनेक ठिकाणी लग्न समारंभ सुरू असताना पाऊस सुरू झाला. त्यामुळे समारंभांचा विचका झाला. पाहुण्यांची संख्या रोडावली.

२ नोव्हेंबरच्या पावसामुळे आमच्या अनेक लग्नाच्या ऑर्डर्स रद्द झाल्या. पावसामुळे कॅटरिंग आणि सजावटवाल्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले, असे ‘दिल्ली दरबार’चे संजय शिंदे यांनी सांगितले. ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडेल याची सूतराम कल्पना नव्हती. त्यामुळे खुल्या मैदानात लाखो रुपयांची सजावट करण्यात आली होती. परंतु पावसामुळे आर्थिक नुकसान झाले. पावसाचा काही नेम नाही. त्यामुळे अनेकांनी खुल्या मैदनातील शाही विवाह सोहळे रद्द केले आहेत, असे एका इव्हेंट कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले.