मुंबई : दरवर्षी भारतामधून परदेशामध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. यंदा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ५२ देशांमधून तब्बल १ हजार ११२ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रवेशासाठी अर्ज केले होते. त्यातील २७१ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतले आहे. या विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी, व्यवस्थापन व विधि अभ्यासक्रमाकडे सर्वाधिक ओढा असल्याचे दिसून येते.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. या अभ्यासक्रमांसाठी परदेशातूनही मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. यंदा ५२ देशातून तब्बल १ हजार ११२ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्ज केले होते. त्यात ४३० विद्यार्थी हे परदेशी नागरिक आहेत. तर ६८२ विद्यार्थी हे मूळ भारतीय परंतु आता अनिवासी भारतीय आहेत.

या नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक म्हणजेच ७४ विद्यार्थी नेपाळमधील आहेत. त्याखालोखाल ७२ विद्यार्थी संयुक्त अरब अमिरातीचे आहेत. त्याशिवाय इंडोनेशिया, कतार, सौदी अरेबिया, ओमान या देशांमधील विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे. विशेष म्हणजे कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, अर्जेंटिना, युके या देशांमधूनही विद्यार्थ्यांनी सीईटी कक्षांतर्गत असलेल्या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केली होती.

राज्यातील उच्च व तंत्रशिक्षणसंस्थांचा दर्जा अधिकाधिक सुधारून परदेशातील विद्यार्थ्यांसाठी उत्तम वातावरण तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. फक्त अभियांत्रिकीच नाही, तर इतरही अभ्यासक्रमांसाठी परदेशातील विद्यार्थ्यांनी भारताला आणि महाराष्ट्राला पसंती द्यावी, यासाठी प्रयत्न असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुण्याला सर्वाधिक पसंती

परदेशातून महाराष्ट्रात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रमुख पसंती पुण्यातील सीओईपी, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आयएलएस लॉ कॉलेज, कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च रावेत, या संस्थांना आहे. त्याशिवाय सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, व्हीजेटीआय आदी संस्थांनाही विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवली आहे.

सर्वाधिक अर्ज आलेले देश

राज्यातील अभियांत्रिकी, विधि, व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठी परदेशातून आलेल्या अर्जांपैकी नेपाळमधून सर्वाधिक ७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्याखालोखाल संयुक्त अरब अमिरातीमधून ७२, इंडोनेशियामधून ६१, कतारमधून ३७ , सौदी अरेबियामधून ३४, ओमानमधून २६, कुवेतमधून १९ आणि अमेरिकेमधून १० विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत.