मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ऑरेंज गेट, पूर्वमुक्त मार्ग – मरिन ड्राईव्ह भुयारी मार्ग (पोहच मार्ग) प्रकल्पाच्या बांधकामासाठी निविदा मागविल्या आहेत. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने या निविदेला तिसऱ्यांदा १५ दिवसांची मुदतवाढ देण्याची नामुष्की एमएमआरडीएवर ओढवली आहे. निविदा प्रक्रिया लांबत असल्याने महत्त्वाकांक्षी प्रकल्प मात्र रखडला आहे.

एमएमआरडीएने २०१३ मध्ये १६.८ किमी लांबीचा पूर्वमुक्त मार्ग बांधला. या मार्गामुळे चेंबूर – सीएसएमटी अंतर केवळ २० ते २५ मिनिटांत पार करणे शक्य झाले आहे. मात्र ऑरेंज गेटजवळ आल्यानंतर नरिमन पॉईंटच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीत अडकावे लागते. या वाहतूक कोंडीतून वाहनांची सुटका करण्यासाठी एमएमआरडीएने पूर्वमुक्त मार्ग, ऑरेंज गेट – नरिमन पॉईंटदरम्यान भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गामुळे चेंबूर – नरिमन पॉईंट दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. चर्चगेट, कुलाबा, नरिमन पॉईंट येथील वाहतूक कोंडीचा प्रश्नही सुटू शकेल. त्यामुळे हा प्रकल्प मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यासाठी एमएमआरडीएने काही दिवसांपूर्वी निविदा मागविल्या आहेत.

हेही वाचा >>>नागपूर: मुंबई पोलीस भरती रद्द होणार? काय आहे नेमके प्रकरण वाचा…

प्रतिसादाअभावी या निविदेला २४ एप्रिल ते ८ मे अशी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र या मुदतीतही प्रतिसाद न मिळल्याने आता पुन्हा, दुसऱ्यांदा १५ दिवासांची मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत २३ मे रोजी संपली असून यावेळीही प्रतिसाद न मिळाल्याने तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ही मुदत ७ जूनपर्यंत असणार आहे.